महाविद्यालयीन तरुणाईच्या कलागुणांना व्यासपीठ देण्यासाठी पुरुषोत्तम करंडक, फिरोदिया करंडक, विनोदोत्तम करंडक, भरत करंडक, पु. ल. देशपांडे करंडक अशा विविध स्पर्धा पुण्यामध्ये होतात. एकांकिका या माध्यमातून नाटय़ानुभव प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी अशा स्पर्धा विद्यार्थ्यांना रंगमंचीय धीटपणाबरोबरच आत्मविश्वासाने वावरण्याचा अनुभवही देतात. यामध्ये यंदा नाटय़संपदा प्रतिष्ठानने सुरू केलेल्या स्पर्धेची भर पडली आहे ती एकांकिकेची नाटय़संपदा जतन करण्याच्या उद्देशातूनच. या स्पर्धेतून पुढे येणाऱ्या गुणवत्तेला घेऊन नाटय़संपदा संस्था व्यावसायिक नाटकाची निर्मिती करणार आहे.
ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर पणशीकर यांनी स्थापन केलेल्या नाटय़संपदा प्रतिष्ठानचा यंदा सुवर्णमहोत्सव आहे. हे औचित्य साधून प्रतिष्ठानतर्फे राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचे आयोजन केले आहे. पुणे, मुंबई, औरंगाबाद, रत्नागिरी, नागपूर, कोल्हापूर, नाशिक आणि गोवा अशा आठ केंद्रांवर या स्पर्धेची प्राथमिक फेरी घेण्यात आली. यामध्ये १३२ एकांकिका सादर झाल्या आहेत. भरत नाटय़ मंदिर येथे पुणे विभागाच्या झालेल्या फेरीसाठी १३ संघांनी सहभाग घेतला होता. अंबर हडप, शिवानी कराडकर आणि वामन तावडे यांनी या फेरीसाठी परीक्षक म्हणून काम पाहिले. त्यातील तीन एकांकिका उपांत्य फेरीमध्ये दाखल झाल्या आहेत. विविध विभागातून प्रत्येकी दोन किंवा तीन याप्रमाणे २२ संघांचा सहभाग असलेली उपांत्य फेरी सोमवारपासून सुरू झाली. भरत नाटय़ मंदिर येथे गुरुवापर्यंत (९ जानेवारी) ही फेरी चालणार असून यासाठी मानसी मागीकर, अनंत कान्हो, प्रा. विजय तापस, डॉ. अनिल बांदिवडेकर आणि विक्रम भागवत हे परीक्षक आहेत.
मुंबई येथील यशवंत नाटय़ मंदिर येथे शनिवारी (११ जानेवारी) येथे उपांत्य फेरीतील सहा संघांमध्ये अंतिम फेरी होणार आहे. या स्पर्धेत विजयी ठरणाऱ्या संघाला ५० हजार रुपयांच्या पारितोषिकासह प्रभाकर पणशीकर फिरता करंडक प्रदान करण्यात येणार आहे. द्वितीय क्रमांकाच्या संघास ३० हजार रुपयांचे तर, तृतीय क्रमांकाच्या विजेत्यास २० हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार असल्याचे प्रतिष्ठानचे अनंत पणशीकर आणि मोहन कुलकर्णी यांनी सांगितले.