संकेतस्थळ कोलमडले; उमेदवारांचा विरस

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी पुढील परीक्षा तोंडावर येऊन ठेपलेली असताना २०१५ च्या राज्यसेवा परीक्षेचा अंतिम निकाल अखेर मंगळवारी रात्री जाहीर झाला. मात्र आयोगाचे संकेतस्थळ सुरू होत नसल्यामुळे उमेदवारांना निकाल पाहता आला नाही.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या २०१५च्या राज्यसेवा परीक्षेचा निकाल मंगळवारी रात्री उशिरा जाहीर झाला. गेल्या काही दिवसांपासून आयोगाचे संकेतस्थळ सुरू होण्यासाठी येणाऱ्या अडचणी निकालाच्या दिवशीही कायम राहिल्या. पुढील राज्यसेवा पूर्वपरीक्षा १० एप्रिलला होणार आहे. त्यापूर्वी निकाल जाहीर झाल्यामुळे उमेदवारांना दिलासा मिळाला असला, तरी मंगळवारी निकाल पाहताच न आल्यामुळे विरसही झाला.

परीक्षेसाठी एकूण ३६८ पदे होती. त्यातील ७२ पदे ही ‘अ’ दर्जाची होती. उपजिल्हाधिकारी (९ जागा), पोलीस उपअधीक्षक (१३ जागा), तहसीलदार (१० जागा), अबकारी कर अधीक्षक (१ जागा) अशा महत्त्वाच्या पदांसाठी ही परीक्षा झाली होती. तुलनेने ‘अ’ दर्जाच्या पदांची संख्या या परीक्षेसाठी कमी असल्यामुळे परीक्षेसाठी प्रतिसाद गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी होता. उमेदवारांना गुणांची पडताळणी करायची असल्यास गुणपत्रक मिळाल्यापासून दहा दिवसात आयोगाकडे अर्ज करायचा आहे.

 ‘अ’ गटातील पदांसाठी निवड झालेले पहिले विद्यार्थी (कंसात गुण)

अभिजित बाळासाहेब नाईक (४२५) – उपजिल्हाधिकारी

राहुल रावसाहेब धस (४३७) – पोलीस उपअधीक्षक / पोलीस उपायुक्त

श्याम संभाजी केंद्रे       (४१९) – विक्रीकर सहायक आयुक्त

अशोक रामभाऊ दांडगे (४१४) – प्रमुख कार्यकारी उपाधिकारी / गटविकास अधिकारी

शरद गंगाधर लोंढे       (३९०) – सहायक संचालक / वित्त सेवा

अतुल अनिल कानडे (४३९) – अबकारी कर अधीक्षक

संगमेश प्रभाकर कोडे (४२९) – तहसीलदार