१९८२ साल. अरुणाचलमधील तवांगमध्ये सीमा सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या ‘२२ मराठा लाईट इन्फंट्री’ च्या जवानांना तवांगच्या उत्तर भागात पाठवले गेले. या भागात जाण्यासाठीचा रस्ता तयार करण्याचीही जबाबदारी या जवानांकडे आली. अतिउंच प्रदेशातील प्रतिकूल हवामान, रस्त्यासाठी लागणाऱ्या दगडांची अनुपलब्धता या सगळ्यावर मात करत जवानांनी अवघ्या सहा महिन्यांत तब्बल साडेबावीस किलोमीटरचा रस्ता बांधला..
छत्रपती शिवाजी महाराजांचेच नाव देण्यात आलेला हा रस्ता बांधणाऱ्या जवानांच्या विजयकथेला पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे. जवानांच्या योगदानाच्या स्मृती जागत्या ठेवण्यासाठी तवांगमध्ये १३,५०० फूट उंचीवर नुकताच शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला. हा रस्ता ज्यांच्या नेतृत्वाखाली बांधला गेला ते कर्नल (निवृत्त) संभाजी पाटील यांनी हा पुतळा सध्या तैनात असलेल्या मराठा लाईट इन्फंट्री बटालियनला प्रदान केला आहे. साडेचार फूट उंचीचा हा अश्वारूढ पुतळा पुण्याचे प्रसिद्घ कलाकार विवेक खटावकर यांनी साकारला आहे.
कर्नल पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘तवांगमधील रस्ता बांधण्यासाठी सुमारे दोन वर्षे लागणे अपेक्षित होते, तसेच या कामासाठी प्रचंड खर्च होणार होता. त्यामुळे हा रस्ता बांधण्याचे काम जवानांकडे सोपवण्यात आले होते. उणे ३० अंश सेल्सियस हवामानात सुमारे दोन हजार जवानांनी हा रस्ता बांधला. तवांगमध्ये दगड उपलब्ध नसल्यामुळे खालच्या बाजूस असलेल्या नदीजवळून वाहनांमधून दगड वाहून न्यावे लागत. ६ महिन्यात बांधल्या गेलेल्या या रस्त्याच्या कामात चार जवान शहीद झाले. या शहीद जवानांची नावे स्मारकावर कोरण्यात आली आहेत.’’
सध्या तवांगमध्ये तीन मराठा बटालियन्स कार्यरत असून हे जवान या पुतळ्याची देखभाल करणार असल्याचेही पाटील म्हणाले.

असा बनला पुतळा!
तवांगमधील हवामान पाहता पुतळा कोणत्या माध्यमात बनवावा याविषयी उपस्थित झालेली आव्हाने विवेक खटावकर यांनी उलगडली. ते म्हणाले, ‘‘तवांगमधील बर्फाळ व पावसाळी वातावरणात टिकू शकणारा आणि वजनाला हलका पुतळा बनवायचा होता. ब्राँझच्या पुतळ्यांचे वजन अधिक असल्यामुळे ब्राँझ न वापरण्याचे ठरले. पुणे ते आसाममधील मिसामारीपर्यंत हा पुतळा आगगाडीने न्यायचा होता. या सर्व गोष्टींमुळे ‘इपोक्सी आणि कार्बन फायबर’ या नवीन प्रकारच्या माध्यमात पुतळा बनवला गेला. या माध्यमाची जाडी ४ ते ५ मिमी असून ते हलके व टिकाऊ आहे.’’ हा पुतळा बनवण्यास २२ दिवस लागल्याचेही खटावकर यांनी सांगितले.

virendra mandlik criticizes shahu chhatrapati s family
छत्रपती कुटुंबाने राजर्षी शाहू महाराजांच्या नावाला साजेसे काम केले नाही; मंडलिक घराण्याची पुन्हा एकदा टीका
Departure of Dnyaneshwar Maharaj Palkhi ceremony on 29th June
पुणे : ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे २९ जूनला प्रस्थान
Statue, Shivaji Maharaj, Assam,
आसाममध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा, चीनच्या सीमेवर २१ पॅरा स्पेशल फोर्समध्ये अनावरण, साताऱ्यातील सुपुत्राचा पुढाकार
Harsh Goenka shares video
ग्वाल्हेरच्या राजवाड्यात राजेशाही जेवणाचा थाट! पाहा, कसे वाढले जाते महाराजांचे ताट; हर्ष गोयंकांनी शेअर केला Video