गणेशोत्सवावर बाहेरून टीका करण्यापेक्षा त्यातून होणारे परिवर्तन आणि घडणारा कार्यकर्ता हे पाहण्यासाठी उत्सवातच सहभागी व्हायला हवे, असे मत ‘ग्राहक पेठे’चे सूर्यकांत पाठक यांनी व्यक्त केले. उत्सवात जे बदल अपेक्षित आहेत ते प्रत्यक्ष सहभागातूनच साध्य होतील, केवळ टीकेने नव्हे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

‘लोकसत्ता’ आणि ‘माणिकचंद उद्योग समूहा’च्या वतीने ‘गणांचा नायक सिद्धिविनायक’ या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व गणेशोत्सवातील ज्येष्ठ कार्यकर्ते उल्हास पवार, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे महेश सूर्यवंशी, ढोल-ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, प्रसिद्ध मूर्तिकार विवेक खटावकर यांनीही या वेळी गणेशोत्सवातील कार्यकर्ते म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात आपले मनोगत व्यक्त केले.

गणेशोत्सवातून होणारे परिवर्तन आणि उत्सवातील कार्यकर्ता कसा घडतो, किती सामाजिक काम करतो हे बघण्यासाठी मंडळात सहभागीच व्हायला हवे, असे पाठक यांनी सांगितले.

पवार म्हणाले, ‘‘गणेशोत्सव सुरू करताना लोकमान्य टिळकांची कल्पना समाजजागृतीची होती. न्यायमूर्ती रानडे यांनी त्या वेळी टिळकांना पत्र लिहून भविष्यात या उत्सवाचे काय होऊ शकेल यातील धोके उपस्थित केले होते. त्यातील काही गोष्टी आताच्या उत्सवात जाणवतात व त्याबद्दल आत्मचिंतन व्हायला हवे. अर्थात लोकमान्यांच्या मनातील काही गोष्टी गणेशोत्सवात निश्चित झाल्या. अनेक मंडळांनी गुलाल वापरणे बंद केले. इतर धर्माचे, विविध प्रदेशांमधून आलेले लोकही गणपती बसवतात. नागरिकांना कमीत कमी त्रास होईल या पद्धतीने उत्सव साजरा करता येतो.’’ ‘ढोल पथकांचे स्वागतच आहे, परंतु आता पथकांमध्ये लेझीमचे डाव बघायला मिळत नाहीत,’ अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

पुढील वर्ष हे गणेशोत्सवाचे १२५ वे वर्ष असून त्या निमित्ताने या उत्सवाचे ‘ब्रँडिंग’ व पर्यटन विकसित करता येईल, असे सूर्यवंशी यांनी सुचवले. राज्य व केंद्र सरकारनेही त्यासाठी मदत करावी, असेही ते म्हणाले, तर उत्सव हे कलाकार घडवणारे व्यासपीठ असल्याचे खटावकर यांनी सांगितले.

ठाकूर म्हणाले, ‘‘शहरात राजकीय पक्षांचे अनेक कार्यकर्ते गणेश मंडळांच्या माध्यमातून तयार झाले. ढोल-ताशा पथकांच्या महिनाभर चालणाऱ्या सरावाबद्दल टीका होते, परंतु वैयक्तिक मानधन न घेता पथकांमधील तरुणांनी गेल्या काही वर्षांत जवळपास तीन कोटी रुपयांची सामाजिक कामे केली आहेत. शहरात २० ते २२ हजार तरुण- तरुणी ढोल पथकांमध्ये असून त्यांच्या ऊर्जेकडे कौतुकाने पाहायला हवे.’’