News Flash

नामवंतांचे बुकशेल्फ : अभिनयासाठी वाचन अविभाज्य घटक

‘स्वयंसिद्धा’ नाटकाच्या वेळी मी प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेतला आणि बारकाईने प्रत्येक संहितेचे वाचन करू लागलो.

स्वरूपकुमार, ज्येष्ठ नाटय़ अभिनेते

शाळेच्या स्नेहसंमेलनामध्ये नाटकात काम करण्यापासून माझी रंगभूमीशी नाळ जोडली गेली. नारायण पेठेमध्ये आम्ही राहायला होतो. त्यामुळे न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत शिक्षण घेताना नाटकाशी माझी जवळीक वाढली. नानासाहेब गोखले हे शिक्षक आमच्याकडून ऐतिहासिक नाटक बसवून घेत. माझा उत्साह पाहून त्यांनी मला नाटकात काम करण्याची संधी दिली. ‘प्रतापगडची झुंज’ या नाटकामध्ये सय्यद बंडाची भूमिका मी साकारली. त्यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यावर लिहिलेली पुस्तके माझ्या वाचनात आली. ‘स्वयंसिद्धा’ हे माझ्या नाटय़क्षेत्रातील कारकीर्दीला सकारात्मक दिशा देणारे नाटक. बंगाली कादंबरीवर आधारित असलेले हे नाटक समजून घ्यायचे असेल, तर ती कादंबरी आधी वाचायला हवी. त्यामुळे नाटकाच्या विषयाशी सुसंगत पुस्तके आणि नाटकाच्या संहितेचे वाचन हा माझ्या आयुष्याचा अविभाज्य घटक होत गेला. रंगभूमीवर काम करणाऱ्या कलावंताने नाटय़संहिता आणि त्या कथानकाशी निगडित पुस्तकांचे वाचन आवर्जून करावे. त्यातूनच रंगभूमीवर साकारलेले आपले पात्र आणि व्यक्तिमत्त्व देखील खुलते. ‘स्वयंसिद्धा’ नाटकाच्या वेळी मी प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेतला आणि बारकाईने प्रत्येक संहितेचे वाचन करू लागलो.

लहानपणी मुंज झाल्यावर भेट मिळालेल्या वस्तूंमध्ये पुस्तके कोणकोणती मिळाली, याचे मला फार अप्रूप होते. ‘बंडखोर बंडय़ा’, ‘गोड गोष्टी’, ‘श्यामची आई’ ही पुस्तके मला भिक्षावळीत मिळाली. त्यामुळे लहानपणापासून वाचन हा माझा छंद होऊ लागला. रमणबागेत असताना सय्यद बंडाची मी साकारलेली भूमिका इतकी गाजली, की त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यावरील ऐतिहासिक नाटकांमध्ये मला भूमिका मिळू लागली. १९५२ च्या सुमारास शाळेमध्ये केलेले ‘तोफेच्या तोंडी’ हे त्यातीलच एक नाटक. त्याची संहिता आणि ऐतिहासिक पुस्तकांच्या वाचनाने मला माझी भूमिका अधिक चांगल्या पद्धतीने साकारण्यास मदत झाली. ऐतिहासिक नाटक आणि त्यात विरोधी पक्षातील भूमिका साकारायची, हे माझ्यासाठी आव्हानच होते. परंतु िहदी संवाद असूनही केवळ वाचनाच्या जोरावर मी ते स्पष्टपणे सादर करू शकलो. शालेय जीवनानंतर गव्हर्नमेंट डिप्लोमा इन कॉमर्स हा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि किलरेस्कर कमिन्समध्ये नोकरी पत्करली.

नोकरी सुरू झाल्यानंतर कामाचा व्याप आणि इतर जबाबदाऱ्यांमध्ये नाटकाकडे लक्ष देता येईल का, अशी शंका होतीच. परंतु कामगार कल्याण विभागातर्फे होणाऱ्या स्पध्रेत सहभाग घेत मी अभिनय क्षेत्रापासून स्वत:ला दूर जाऊ दिले नाही. ‘काळ-वेळ’ सारखे रहस्यमय कथा असलेले नाटक करण्याकरिता वाचलेली रहस्यमय पुस्तके आजही अंगावर काटा आणणारी आहेत. नोकरी करीत असतानाच बाबूराव गोखले यांनी मला ‘स्वयंसिद्धा’ या नाटकात काम करशील का, असे विचारले. अभिनयाची आवड असल्याने मी लगेचच होकार दिला आणि माझे पुन्हा एकदा नामकरण झाले, ते म्हणजे स्वरूपकुमार.

स्वयंसिद्धा या नाटकाची संहिता पूर्णपणे कळावी, यासाठी मी लेखक बंड्डोपाध्याय यांनी लिहिलेल्या बंगाली कादंबरीचे वाचन केले. त्यामुळे स्वरूपकुमारची भूमिका उत्तम रीत्या साकारू शकलो. त्या नाटकाचे हजारो प्रयोग केले आणि रसिकांकडून मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे माझे स्वरूपकुमार असे कायमस्वरूपी नामकरण झाले. किंबहुना या नामकरणाचे श्रेय मी वाचनसंस्कृतीला देईल. मी केलेल्या वाचनामुळेच त्या भूमिकेला न्याय देऊ शकलो. त्यानंतर ‘तुळस तुझ्या अंगणी’, ‘मंजू-मंजू’, ‘या डोळ्यांची दोन पाखरे’, ‘सासूबाईंचं असंच असतं’ आणि ‘कुर्यात सदा टिंगलम्’ यांसारख्या अनेक नाटकांमध्ये भूमिका साकारल्या. प्रत्येक वेळी नाटय़संहिता आणि त्या विषयाशी निगडित पुस्तकांनी मला साथ दिली.

त्या काळी महाराष्ट्रातील विविध भागांसह गोव्यालाही नाटकासाठी आमचे दौरे होत. परगावी गेल्यानंतर नाटकाचे प्रयोग रात्री असायचे. त्यामुळे दिवसभर लॉजमध्ये काय करायचे, असा प्रश्न नेहमीच असायचा. त्यामुळे दिवसभर विविध पुस्तकांचे वाचन मी करायचो. टिळक चौकातील अलका चित्रपटगृहाध्ये एकदा चित्रपट बघायला गेल्यानंतर त्यावरून मला नाटक सुचले आणि मी ‘लाइफ पार्टनर’ या नाटकाचे लेखन केले. केवळ लेखनच नाही, तर नाटकात स्त्रीकलाकाराचा अभिनय देखील केला. स्वरूपकुमारच्या अभिनयात सहजता आहे, असे अनेक जण म्हणतात. खरे-खोटे मला माहीत नाही, जर अशी सहजता असेलच तर त्याचे श्रेय मी वाचनाला देईन. सध्याच्या काळात प्रेक्षकांसमोर मनोरंजनाची अनेक साधने उपलब्ध झाली आहेत. चित्रपट, मालिकांचे प्रमाणही वाढले आहे. मात्र, उत्तम लेखन, कथानक, दर्जेदार सादरीकरण, उत्तम संवाद आणि अभिनय असेल, तर रसिक नाटकाकडे कधीही पाठ फिरविणार नाहीत. उत्तम लेखन, संवाद आणि सादरीकरणाकरिता आधी वाचले पाहिजे, हा मंत्र प्रत्येक कलावंताने लक्षात ठेवायला हवा.

विनोदी भूमिका साकारणाऱ्या अनेक व्यक्तिरेखा मी केल्या. परंतु, ‘ही वाट दूर जाते’ या नाटकामध्ये केलेली दृष्टिहीन व्यक्तीची भूमिका माझ्या फार जवळची आहे. त्या वेळी मी हे विद्यार्थी कशा प्रकारे वावरतात, त्यांची दिनचर्या कशी असते याचा पूर्ण अभ्यास केला होता. प्रत्यक्ष निरीक्षणासोबतच दृष्टिहीन व्यक्तींच्या जीवनाविषयी काही पुस्तके देखील वाचली. त्यामुळे ती भूमिका मी सहजपणे साकारू शकलो. पूर्वी महाराष्ट्रभर नाटकाचे दौरे होत असत. परंतु आता पुण्या-मुंबई बाहेर कलाकार जात नाहीत. दूरचित्रवाणीच्या माध्यमातून प्रत्येक गोष्ट आपल्या जवळ आली असली, तरी कलावंतांच्या कलेचा आस्वाद हा प्रत्यक्ष रंगभूमीवर घ्यायला हवा, तरच त्याचे व्यक्तिमत्त्व आपण समजून घेऊ शकू. एखादी भूमिका साकारण्यामागची कलावंताची मेहनत, त्याविषयीचे वाचन आणि अभिनयाविषयी प्रेम रसिकांपर्यंत पोहोचविण्याकरिता नाटक आणि नाटय़कलावंत जिवंत राहायला हवा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2016 3:06 am

Web Title: swaroop kumar bookshelf
Next Stories
1 बाजारभेट : महिलांच्या जिव्हाळय़ाची ऐतिहासिक बाजारपेठ!
2 दहावीनंतर लाखो विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर!
3 पोलीस उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक पदासाठी संयुक्त पूर्वपरीक्षा
Just Now!
X