शहरातील उष्णतेची तीव्र लाट निवळली

पुणे : उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे गेल्या तीन दिवसांपासून होरपळत असलेल्या पुणेकरांना सोमवारी तापमानात घट झाल्याने हलकासा दिलासा मिळाला. उष्णतेची लाट तूर्त निवळली असली, तरी कमाल तापमान अद्यापही चाळिशीपार म्हणजेच ४०.२ अंश सेल्सिअसवर असल्याने उन्हाचा चटका जाणवतो आहे. रात्रीच्या किमान तापमानात मात्र कोणतीही घट न झाल्याने दिवसाच्या उन्हापेक्षा रात्रीचा उकाडा आता त्रासदायक होतो आहे. पुढील आठवडाभर तापमान कायम राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आला आहे.

पुणे शहर आणि परिसरामध्ये एप्रिलच्या तिसऱ्या आठवडय़ाच्या सुरुवातीला पावसाळी स्थिती होती. त्यानंतर २३ एप्रिलपासून तापमानात अचानक वाढ सुरू होऊन एप्रिलमध्ये प्रथमच तापमान चाळिशीपार गेले. त्यानंतर निरभ्र आकाश आणि कोरडय़ा हवामानामुळे तापमानात झपाटय़ाने वाढ होत गेली. राज्यात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे उष्णतेची तीव्र लाट आली. त्याचा फटका पुणे शहरालाही बसला. कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत ४.५ ते ५.० अंशांनी वाढून शहरातही गेल्या तीन दिवसांपासून उष्णतेची लाट होती.

शहरात २६ एप्रिलला ४२.६, तर २७ एप्रिलला ४२.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे २८ एप्रिलला ४३.० अंशांवर तापमानाचा पारा गेला होता. गेल्या १२२ वर्षांच्या तापमानापासून केवळ ०.३ अंशांनी हे तापमान कमी होते. त्यामुळे पुणेकरांसाठी गेल्या कित्येक वर्षांतील हा सर्वात उष्ण दिवस ठरला. अंग भाजून काढणारे ऊन आणि घामाघूम करणारा उकाडा पुणेकरांनी अनुभवला. त्यानंतर सोमवारी किमान तापमानात सुमारे ३ अंशांनी घट झाल्याने पुणेकरांना दिलासा मिळाला. मात्र, तापमान अद्यापही चाळिशीत आहे. त्यामुळे दुपारी उन्हाच्या झळा जाणवत आहेत.

राज्यातही दिलासा; उष्णतेची लाट पुन्हा?

बहुतांश भागात गेले तीन दिवस उष्णतेची तीव्र लाट असल्याने राज्य होरपळून निघाले होते. मात्र, सोमवारी अनेक ठिकाणी कमाल तापमानात किंचित घट झाल्याने काहीसा दिलासा मिळाला. मात्र, विदर्भात बहुतांश ठिकाणी, तर उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात तुरळक ठिकाणी ३० एप्रिललाही उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मध्य महाराष्ट्रातील तापमानात प्रामुख्याने घट झाली. विदर्भात मात्र, सोमवारीही उष्णतेची लाट होती. अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४६.९ अंश तापमानाची नोंद झाली.