राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा परिस्थिती पाहून घेतली जाणार आहे. नोव्हेंबर डिसेंबरच्या सुमारास फेरपरीक्षा होऊ शकेल. मात्र, या विद्यार्थ्यांच्या अकरावी प्रवेशाचे काय, हा  प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे.

राज्य मंडळाकडून दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर केल्यानंतर महिन्याभरात फे रपरीक्षा घेतली जाते. त्यात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी संधी मिळते. मात्र करोना संसर्गामुळे यंदा फे रपरीक्षा घेण्यात आलेली नाही. तसेच फेरपरीक्षा कधी होणार याबाबत अद्याप निर्णयही झालेला नाही.

राज्य मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे म्हणाल्या, ‘शालेय शिक्षण मंत्री वर्षां गायकवाड यांनी सांगितल्यानुसार संसर्गाची परिस्थिती पाहून फेरपरीक्षा घेण्यात येईल. नोव्हेंबर-डिसेंबरच्या सुमारास परीक्षा होऊ शकेल. सद्यस्थितीत परीक्षा घेण्यात अनेक अडचणी आहेत. प्रशासनाने अनेक शाळा विलगीकरण कक्षासाठी घेतल्या आहेत. परस्पर अंतर राखून परीक्षा घेण्यासाठी परीक्षा कक्ष वाढवावे लागतील, त्यासाठी मनुष्यबळही वाढवावे लागेल. मात्र, त्याआधी शाळा उपलब्ध व्हाव्या लागतील. त्यामुळे परिस्थितीचा आढावा घेऊन परीक्षा घेण्यात येईल.’

दरम्यान, फेरपरीक्षा नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये घेतली जाणार असल्यास एटीकेटी मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या अकरावी प्रवेशाचे काय, हे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार का असा प्रश्न आहे.