शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) अर्जामध्ये दुरुस्ती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने मुदतवाढ दिली असून आता १० नोव्हेंबपर्यंत अर्जात सुधारणा करता येणार आहेत. त्याचप्रमाणे परीक्षेसाठीच्या अर्जामध्येही वाढ झाली आहे.
या वर्षी राज्यात दुसऱ्यांदा टीईटी होत आहे. या वर्षी शिक्षक पात्रता परीक्षा १४ डिसेंबरला होणार आहे. मराठी, इंग्रजी आणि उर्दू या माध्यमांमध्ये ही परीक्षा घेण्यात येते. पहिली ते पाचवी आणि सहावी ते दहावी अशा दोन भागांमध्ये ही परीक्षा घेण्यात येते. परीक्षेचे ऑनलाइन अर्ज भरून परीक्षा शुल्क भरण्यासाठी २७ ऑक्टोबपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्याचप्रमाणे अर्जाची छापील प्रत आणि कागदपत्रे शिक्षण विभागाकडे सादर करण्यासाठी ३१ ऑक्टोबपर्यंत मुदत होती. मात्र, अर्ज भरण्याच्या कालावधीमध्ये दिवाळी होती. त्याचप्रमाणे शेवटच्या दोन दिवसांमध्ये संकेतस्थळ सुरू होण्यास अडचण येत असल्यामुळे अनेकांना अर्जात सुधारणा करता आल्या नाहीत. त्या पाश्र्वभूमीवर मुदत वाढवून देण्याची मागणी उमेदवारांकडून करण्यात येत होती. अखेर परीक्षा परिषदेने उमेदवारांची विनंती मान्य करत अर्जात सुधारणा करण्यासाठी आणि कागदपत्रांच्या पडताळणीसाठी मुदत वाढवून दिली आहे. आता १० नोव्हेंबपर्यंत उमेदवार अर्जात सुधारणा करू शकतील.
अर्ज अंतिम करण्याच्या शेवटच्या दोन दिवसांत अर्जामध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. सध्या ५ लाख ८ हजार ७०७ विद्यार्थ्यांचे अर्ज परिषदेकडे आहेत. यातील साधारण ४ लाख १४ हजार अर्ज हे दोन्ही भागांची परीक्षा देण्यासाठी आले आहेत. उमेदवारांनी अर्ज तपासून पाहावेत. अर्जात जात, प्रवर्ग, नाव, जन्मतारीख, मोबाइल क्रमांक, शुल्काच्या चलनाचा क्रमांक आदी तपशील तपासून पाहावा. त्याचप्रमाणे फोटो बरोबर आहे का याचीही पडताळणी करावी, असे आवाहन परिषदेचे आयुक्त व्ही. बी. पायमल यांनी केले आहे.