सध्या जे खाते वाटप झालं आहे ते काही काळापुरतं आहे. या महिनाअखेरपर्यंत मंत्रीमंडळाचे स्वरुप स्पष्ट होईल, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. पिंपरी-चिंचवड येथे माध्यमांशी ते बोलत होते.

पवार म्हणाले, सध्या मुख्यमंत्र्यांशिवाय सहा मंत्री राज्याचा कारभार पाहत आहेत. नागपूरला होणाऱ्या आगामी हिवाळी अधिवेशनात काही प्रश्न निर्माण झाल्यास हे सहा ही जण ते सांभाळून घेऊ शकतात. कारण हे सर्वजण अनुभवी मंत्री आहेत. सुभाष देसाई, एकनाथ शिंदे हे मागच्या सरकारच्या काळात मंत्री होते. छगन भुजबळ, जयंत पाटील, नितीन राऊत, बाळासाहेब थोरात हे देखील आघाडी सरकारच्या काळात मंत्री होते. यातील काही जणांनी दहा आणि पंधरा वर्षे मंत्रीपदावर काम केलेलं आहे.

राज्य मंत्रिमंडळात एकूण मंत्र्यांची संख्या ४३ इतकी असते आज मुख्यमंत्रीधरून ७ जण राज्याचा कारभार पाहत आहेत. हे लोक संपूर्ण राज्याचा कारभार दीर्घकाळ पाहू शकत नाहीत. केवळ अधिवेशनापुरता ते कारभार निभावू शकतात. मात्र, मंत्रीमंडळाचा विस्तार कधी करायचा आणि कोणाला कोणते मंत्रीपद द्यायचे याचा निर्णय तिन्ही पक्षांचे प्रमुख मिळून घेतील, असं यावेळी अजित पवार म्हणाले.

अवकाळी पाऊस झाल्याने शेतकरी पिचून निघाला आहे, नाउमेद झाला आहे. त्याला या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी काहीतरी ठोस निर्णय घ्यावा लागेल. हा निर्णय घेत असताना कितपत ओझं राज्य सरकारला झेपेल याबद्दल अभ्यास अर्थ खातं आणि संबंधीत करतील. तसेच त्याबद्दलचा अंतिम निर्णयही तिन्ही पक्षांचे प्रमुख बसून घेतील, असंही पवारांनी यावेळी स्पष्ट केलं.