‘राजा शिवछत्रपती’ पुस्तकामध्ये दीनानाथ दलाल यांची चित्रे वापरली आहेत. शिवचरित्रातील एका प्रसंगावर मला त्यांच्याकडून चित्र काढून हवे होते. अभिनयकौशल्य ‘उत्तम’ असल्यामुळे मी भिंतीकडे तोंड करून त्यांना प्रसंग सांगत होतो. त्यानुसार दलाल चित्र रेखाटत होते. चित्र काढून झाले आणि दलाल यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला. ‘आमच्या गोवा हिंदूू असोसिएशनच्या नाटकात तुम्ही काम कराल का’, असे दलाल यांनी मला विचारले. ही प्रारंभी मला पावती वाटली. पण, तो प्रांत नाही हे मला ठाऊक होते. हीच माझी पहिली आणि शेवटची संगभूमी सेवा.. ‘जाणता राजा’ महानाटय़ाचे असंख्य प्रयोग करणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शनिवारी या आठवणींना उजाळा दिला.
बालगंधर्व संगीत रसिक मंडळातर्फे पुरंदरे यांच्या हस्ते संगीत रंगभूमीवरील गायिका-अभिनेत्री अस्मिता चिंचाळकर यांना बालगंधर्व गुणग्राहक पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. मंडळाचे अध्यक्ष सुरेश साखवळकर आणि कार्याध्यक्ष नाना कुलकर्णी व्यासपीठावर होते. विविध कलाकारांना या वेळी पुरस्काराने गौरविण्यात आले.
संगीत रंगभूमीच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या बालगंधर्व यांच्या कर्तृत्वाप्रमाणेच त्यांचे दातृत्वही महान होते. त्यांची सर्जनशीलता अस्सल असल्यामुळे स्वत:मधील माणूस त्यांनी जागृत ठेवला होतो, असे सांगून पुरंदरे म्हणाले, वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतार बालगंधर्व यांच्या वाटय़ाला आले. मात्र, त्याने खचून न जाता ते नि:स्वार्थीपणे संगीत रंगभूमीची सेवा करीत राहिले.
चिंचाळकर म्हणाल्या, संगीत नाटकातील भूमिका आणि अभिनयासाठी आजवर भरपूर टाळ्या मिळाल्या. पण, आज माझ्यासाठी या टाळ्या वाजत आहेत याचा मनस्वी आनंद झाला आहे. साखवळकर यांनी प्रास्ताविक केले. अवंती बायस आणि अजित भालेराव यांनी सूत्रसंचालन केले. उत्तरार्धात झालेल्या रंगप्रभा या मैफलीत चिंचाळकर, मुकुंद मराठे, डॉ. मंजिरी तेंडुलकर, आनंद प्रभुदेसाई, नीलाक्षी पेंढारकर, शरद बापट, रवींद्र कुलकर्णी आणि सुरेश साखवळकर यांनी नाटय़पदे सादर केली.