राज्यातील दहावी आणि बारावीचा निकाल यावर्षी घसघशीत म्हणावा असा लागला असला तरीही समुपदेशकांचे काम काही कमी झालेले नाही. निकालानंतर विद्यार्थ्यांना येणारे नैराश्य, त्यांच्या समस्या कमी झालेल्या नाहीत. निकाल चांगला लागला असला, तरी त्यामुळे वाढलेली स्पर्धा आणि स्वत:कडून असलेल्या अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे नैराश्य येणाऱ्या विद्यार्थ्यांंची संख्या कमी झालेली नाही.
राज्यातील दहावी आणि बारावीचा निकाल लागल्यानंतर निराश झालेल्या विद्यार्थ्यांकडून उचलले जाणारे एखादे चुकीचे पाऊल, पुढे काय.. हा नेहमीच सतावणारा प्रश्न, पालकांची काळजी, प्रवेशाचा ताण आणि सगळ्यावर उपाय म्हणून समुपदेशकांकडे होणारी गर्दी हे नेहमीचे दृश्य. यावर्षी निकाल उत्तम लागूनही या दृश्यामध्ये विशेष फरक पडलेला नाही. मनासारखा निकाल न लागल्यामुळे समुपदेशकांकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली नसल्याचे समुपदेशक सांगतात. मात्र, आता विद्यार्थ्यांच्या समस्यांचे स्वरूप काहीसे बदलले आहे.
यावर्षी वाढलेल्या निकालामुळे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले आहे. मात्र, त्याचवेळी प्रवेशासाठीची स्पर्धाही वाढली आहे. त्यामुळे सध्या बारावीला गुण कमी मिळाले यापेक्षाही हव्या त्या महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही, म्हणून विद्यार्थ्यांना ताणाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत पुणे विभागीय मंडळामार्फत विद्यार्थ्यांचे समुपदेशन करणारे बी. डी. गरूड यांनी सांगितले,‘‘गेल्यावर्षीच्या तुलनेत निकाल चांगला लागला नाही म्हणून संपर्क साधणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा आता हवा तिथे प्रवेश मिळत नाही. एखाद्याच विषयात खूप कमी गुण मिळाले म्हणून निराश झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. विद्यार्थ्यांच्या स्वत:कडून आणि पालकांच्या आपल्या मुलांकडून अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे अगदी चांगले गुण मिळूनही विद्यार्थी तणावाखाली असलेले दिसत आहेत.’’
विद्यार्थ्यांना गुण चांगले असूनही प्रथम वर्षांसाठी किंवा जेईईमध्ये कमी गुण मिळाल्यामुळे अभियांत्रिकी शाखेला प्रवेश मिळणार का, याची चिंता सध्या पालकांना भेडसावत आहे. विद्यार्थ्यांइतकेच पालकही समुपदेशनासाठी येत असल्याचे समुपदेशकांनी सांगितले. एरवी वर्गात मागे असलेला एखादा विद्यार्थी आपल्या मुलाच्या पुढे गेला, नातेवाइकांच्या, मित्रांच्या मुलाला आपल्या मुलापेक्षा अधिक गुण मिळाले, अशाही समस्या पालक मांडत आहेत.’’ काही वर्षांपूर्वी हुशार मुलाचे लक्षण म्हणून मानण्यात येणारे ८० टक्के गुणही आता अगदीच कमी वाटायला लागले आहेत. त्यामुळे वरकरणी चांगले गुण मिळालेले दिसत असूनही पालक आणि विद्यार्थी तणावाखाली असल्याचे समुपदेशकांनी सांगितले.
नापास विद्यार्थ्यांचा प्रश्न तसाच
निकाल चांगला लागला असला तरी नापास झालेल्या १० ते १२ टक्के विद्यार्थ्यांचा प्रश्न कायम आहे. आता आम्ही पुढे काय करायचे, असा प्रश्न या नापास विद्यार्थ्यांना भेडसावत आहे. सगळ्या विषयात चांगले गुण असताना एखाद्याच विषयात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना नैराश्याला सामोरे जावे लागत आहे. याबाबत समुपदेशक अनन्या छत्रे यांनी सांगितले,की नापास झाल्यामुळे नैराश्य आलेल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न तसाच आहे. या विद्यार्थ्यांकडून येणाऱ्या कॉल्समध्ये काही फरक पडलेला नाही. दहावीचा निकाल जाहीर झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी अशाप्रकारचे ४ ते ५ कॉल्स आले आहेत. बारावीच्या निकालानंतरही अशीच परिस्थिती होती.