• फर्ग्युसन रस्ता, महात्मा गांधी रस्ता सायंकाळनंतर बंद
  • गैरप्रकार रोखण्यासाठी गुन्हे शाखेची पथके

सरत्या वर्षांला निरोप तसेच नववर्षांचे स्वागत करताना होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी सोमवारी (३१ डिसेंबर) शहरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. लष्कर तसेच डेक्कन भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. फर्ग्युसन रस्ता तसेच लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता परिसरात होणारी तरुणाईची गर्दी विचारात घेऊन सायंकाळी सहानंतर गर्दी ओसरेपर्यंत रस्ते बंद ठेवण्यात येणार आहेत.

हडपसर भागातील मगरपट्टा रस्ता, अमानोरा मॉल, कोरेगाव पार्क ते मुंढवा एबीसी फार्म रस्ता भागातील वाहतूक व्यवस्थेत सायंकाळनंतर बदल करण्यात येणार आहे. फर्ग्युसन रस्ता (गोखले स्मारक चौक) आणि महात्मा गांधी रस्ता (हॉटेल अरोरा टॉवर चौक ते पूलगेट पोलीस चौकी) सर्व प्रकारच्या वाहनांसाठी सोमवारी सायंकाळी सहा ते पहाटे पाच वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. शहराच्या महत्त्वाच्या ३० चौकातील वाहतूक नियंत्रक पहाटे पाच वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. वाहनचालकांनी पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. मद्य पिऊन वाहन चालवू नये, असे आवाहन वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी केले आहे.

नववर्षांच्या पाश्र्वभूमीवर शहरातील महत्त्वाचे रस्ते, तसेच प्रमुख चौकात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी बंदोबस्ताची आखणी केली आहे. शहरातील सर्व पोलीस ठाणे तसेच गुन्हे शाखेतील पथके बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहेत. गर्दीत होणारे गैरप्रकार तसेच छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलिसांचे पथक महत्त्वांच्या रस्त्यांवर गस्त घालणार आहे. नागरिकांनी कायद्याचे पालन करुन नववर्ष उत्साहात साजरे करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त वेंकटेशम यांनी केले आहे.