एप्रिलपासून खेडशिवापूर, आणेवाडी टोल वाढणार
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारमधील पुणे (देहूरोड)- सातारा रस्त्याच्या सहा पदरीकरणाचे अडीच वर्षांचे काम तब्बल साडेसात वर्षांपासून रखडले असताना शासनाकडून वेळोवेळी मुदतवाढीच्या पायघडय़ा टाकल्या जात असतानाच आता रिलायन्स इन्फास्ट्रक्चर कंपनीला टोलवाढीचे बक्षीस देण्यात येणार आहे. एप्रिलपासून या रस्त्यावरील खेडशिवापूर आणि आणेवाडी या नाक्यांवरील टोलच्या दरात वाढ केली जाणार आहे. यापूर्वी खुद्द केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याबाबत भाष्य केले होते. मात्र, त्यानंतरही ‘रिलायन्स’ला अभय मिळाल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले.
देहूरोड ते सातारा या सुमारे १४० किलोमीटर रस्त्याचे हे काम आहे. ते ऑक्टोबर २०१० मध्ये सुरू झाले होते. नियोजनानुसार हे काम मार्च २०१३ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. काम संथगतीने होत असल्याचे लक्षात येऊनही कंपनीच्या मागणीखातर वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे केवळ अडीच वर्षांच्या या कामाला पाच वर्षांची मुदतवाढ देऊनही ते पूर्ण झालेले नाही. सजग नागरिक मंचच्या वतीने माहिती अधिकार क्षेत्रातील कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी वेळोवेळी या कामाबाबत माहिती अधिकारात तपशील मागविला होता. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानेही माहिती अधिकारात दिलेल्या तपशिलात रस्त्याच्या कामाबाबत रिलायन्स कंपनीकडून दिरंगाई होत असल्याचे अधोरेखित करण्यात आले आले होते.
गडकरी यांच्या उपस्थितीत खास रस्त्यांच्याच प्रश्नावर १४ ऑगस्ट २०१६ रोजी पुण्यात घेतलेल्या लोकप्रतिनिधींच्या बैठकीत पुणे-सातारा रस्त्याच्या रेंगाळलेल्या कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. वेळेत काम न केल्यास संबंधित ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचा इशारा गडकरी यांनी त्या वेळी दिला होता. मात्र, त्यानंतरही कोणतीच कारवाई झाली नाही. २७ ऑगस्ट २०१७ रोजी याच रस्त्यावर चांदणी चौकातील उड्डाण पुलाचे भूमिपूजन
गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी या कामातील दिरंगाई ‘काळा डाग’ असल्याचे भाष्य त्यांनी केले होते. मात्र, त्यानंतरही कामाचा वेग वाढू शकला नाही. सद्यस्थितीत अद्यापही काही भागात काम अपूर्ण आहे.
त्यामुळे छोटे-मोठे अपघात सातत्याने होत असतात. अशा स्थितीत केवळ करारामध्ये उल्लेख असल्याचा आधार घेऊन टोलवाढ देण्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विवेक वेलणकर याबाबत म्हणाले की, वेळेत काम होत नसल्याने खरेतर टोल बंद झाला पाहिजे.
मात्र, कामाच्या दिरंगाईबाबत ठेकेदाराला टोलवाढीतून बक्षीसच दिले जात आहे. नितीन कडकरी यांनी काळ्या यादीत टाकण्याचे भाष्य केलेल्या ठेकेदाराला शासनाकडून सातत्याने अभय देण्यात येत आहे.
एप्रिलपासून लागू होणारा नवा टोलदर
खेडशिवापूर टोलनाका
वाहन प्रकार एकेरी प्रवास दुहेरी प्रवास
मोटार, हलकी वाहने ९० १३५
व्यावसायिक वाहने १४५ २१५
बस, ट्रक ३०५ ४५५
मल्टीएक्सेल वाहन ४७५ ७१०
आणेवाडी टोलनाका
मोटार, हलकी वाहने ६० ९५
व्यावसायिक वाहने १०० १५०
बस, ट्रक २१० ३१५
मल्टीएक्सेल वाहने ३३० ४९५