जकात रद्द करा, अशी आग्रही मागणी करणारे व त्यासाठी पिंपरी-चिंचवड बंद पुकारणारे शिवसेनेचे खासदार गजानन बाबर आणि त्यांच्या समर्थक व्यापारी संघटनांनी आता एलबीटी (स्थानिक संस्था कर) ला देखील तीव्र विरोध दर्शविला आहे. आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी गुरुवारी एलबीटीवर चर्चासत्र आयोजित केले असतानाच बाबर यांनी ‘व्यापार बंद’ ची हाक दिली आहे.
खासदार बाबरांच्या उपस्थितीत मंगळवारी व्यापाऱ्यांची बैठक झाली, त्यानंतर भरगच्च पत्रकार परिषदेत व्यापारी संघटनांच्या प्रमुखांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मधुकर बाबर, नितीन बनकर, गोविंद पानसरे, विजय गुप्ता, सुरेश गादिया, संदीप बेलसरे यांच्यासह २० संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. व्हॅट लागू करताना जकात रद्द करू, असे आश्वासन सरकारने व्यापाऱ्यांना दिले होते. मात्र, तो शब्द न पाळल्याने व्यापाऱ्यांमध्ये असंतोष असतानाच सरकारने आता एलबीटी करप्रणाली लागू करण्याची घोषणा केली आहे. मात्र, त्यास आमचा विरोध असल्याचे सांगत बाबरांनी गुरुवारी बंद पाळून सरकारचा निषेध करण्याचा निर्धार या वेळी व्यक्त केला आहे. व्यापारी दुकाने बंद ठेवतील. मात्र, आयुक्तांच्या उपस्थितीत होणाऱ्या एलबीटीच्या कार्यक्रमात सहभागी होतील, असे या वेळी स्पष्ट करण्यात आले. ‘एलबीटी हटाव, शहर बचाव’ ही व्यापाऱ्यांची घोषणा असणार आहे.
एलबीटीमुळे छोटय़ा व्यावसायिक व व्यापाऱ्यांना बऱ्याच कटकटींना सामोरे जावे लागणार आहे. ‘पोलीसराज’ सुरू होऊन पालिका अधिकाऱ्यांच्याही हप्तेगिरीला व मनमानीला ऊत येणार आहे. काळाबाजार सुरू होईल व भ्रष्टाचार वाढेल. एलबीटीची यंत्रणा पालिकेकडे नाही यांसारखे अनेक मुद्दे व्यापाऱ्यांनी उपस्थित केले आहेत. एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारूनही सरकारने दखल न घेतल्यास पुढील आठवडय़ात बेमुदत बंद करण्याचा निर्णय घेऊ, असा इशाराही या वेळी देण्यात आला.