|| विद्याधर कुलकर्णी

तापमानवाढीचा परिणाम; समुद्रातील अन्नसाखळी बिघडण्याचीही भीती

Mentally retarded girl pregnant from sexual abuse crime was solved with the efforts of Bharosa Cell
लैंगिक अत्याचारातून मतीमंद मुलगी गर्भवती; भरोसा सेलच्या प्रयत्नाने उलगडला गुन्हा
Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!
12 different products in maharastra received gi tags
तुळजापूरच्या कवड्याच्या माळेसह कोणत्या उत्पादनांना मिळाले जीआय मानांकन? जाणून घ्या सविस्तर…

पुणे : जागतिक तापमानवाढीचा कासवांच्या प्रजोत्पादनावर परिणाम होत असून भविष्यात जगभरात नर कासवांची संख्या घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नर कासवांची संख्या कमी झाल्यामुळे काही वर्षांनी कासवांची संख्या घटेल आणि त्याचा परिणाम समुद्रातील अन्नसाखळीवर होईल, असा निष्कर्ष अभ्यासातून पुढे आला आहे.

जागतिक कासव दिन रविवारी (२३ मे) साजरा होत असताना कासवांच्या भवितव्याविषयी चिंता व्यक्त करणारी माहिती या विषयातील संशोधनातून समोर आली आहे. कायद्याने बंदी असूनही पकडून विक्री करण्याच्या गैरप्रकारांमुळे कासवांच्या संख्येमध्ये घट झाल्याचे वास्तव यापूर्वीच्या काळात होते. मात्र, आता जागतिक तापमानवाढीचा फटका कासव प्रजातीला बसण्याची भीती व्यक्त केली जात असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वन्यजीव संरक्षक आणि देवगड महाविद्यालयातील प्राध्यापक नागेश दफ्तरदार यांनी दिली. जगभरात सात प्रजातींचे कासव आढळतात. त्यापैकी भारताच्या म्हणजे पश्चिम किनारपट्टीला चार प्रजाती सापडतात. काही कासवाच्या प्रजाती वनस्पती किंवा शेवाळ्याची वाढ नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. काही कासवे विषारी प्राण्यांवर नियंत्रण ठेवतात, तर काही प्रजातींचे कासव जेलिफिश खातात. जेलिफिश खाणारे कासव कमी झाले असल्याने जेलिफिशची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. माशांची छोटी पिले खाणाऱ्या जेलिफिशमुळे माशांच्या संख्येवर परिणाम होत आहे. त्यामुळे मच्छीमारांना मासे मिळत नाहीत. अशा प्रकारे अन्नसाखळीवर परिणाम होत आहे, याकडे दफ्तरदार यांनी लक्ष वेधले.

कासव संरक्षण व संवर्धनाला चालना

पर्यावरण साखळीतील कासवांना अभय देण्याच्या उद्देशातून कासवांचे संरक्षण आणि संवर्धन होत आहे. ओरिसामध्ये अरिबाडा येथे एका महिन्यात पाच-सहा लाख कासवं येऊन घरटी करतात आणि अंडी घालतात. महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर २०० ते ३०० घरटी होतात, अशी माहिती कासव संवर्धन क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते भाऊ काटदरे यांनी दिली. राज्यात २००० पासून सह्याद्री निसर्गमित्र फाऊंडेशनच्या माध्यमातून कासव संवर्धनाचे काम सुरू केले. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये ३० ठिकाणी संरक्षणाचे काम हे वन विभाग आणि स्थानिक नागरिकांच्या हाती सुपूर्द करण्यात आले आहे, असे काटदरे यांनी सांगितले. वेळास येथे कासव महोत्सवाचे आयोजन करून स्थानिक नागरिकांना उत्पन्नाचा स्रोत निर्माण करून दिला आहे. कासवाची पिले बघायला आलेले पर्यटक तेथील घरी राहतात. त्यातून स्थानिकांना उत्पन्न मिळते. त्यामुळे आपल्या चरितार्थासाठी कासव जगले पाहिजे, हा संस्कार रुजला आहे, याकडे काटदरे यांनी लक्ष वेधले.

संख्याघटीची भीती का? जमिनीवरचे कासव मातीत आणि समुद्रातील कासव वाळूमध्ये ५० ते ६० सेंटीमीटर खोलीमध्ये अंडी घालते. या घरट्याचे तापमान २७ अंशांपेक्षा जास्त असेल तर अंड्यातून ८० टक्के मादी कासवांची निर्मिती होते. तापमान २७ अंशांपेक्षा कमी असेल तर नर कासव तयार होतात. तापमान वाढत असल्यामुळे अंड्यांतून केवळ मादी कासवांची निर्मिती झाली आणि संयोगासाठी नर मिळाले नाहीत तर कासवांची संख्या घटण्याची भीती आहे.

नर कासवेच कमी झाली तर…

जागतिक अभ्यासानुसार २१०० सालापर्यंत ३.७ अंश तापमान वाढण्याची शक्यता आहे. समुद्राचे तापमान वाढले तर कासवांची काही अंडी नष्ट होण्याचा धोका आहे. पिलांची संख्या कमी होऊन मादी कासवांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. नर कासवच झाले नाहीत तर भविष्यात कासवांच्या संख्येवर परिणाम होईल.