पुण्यातील सभेनंतर बघा राज्यात कसा धुमाकूळ घालतो, दोन दिवसांपूर्वी असा इशारा देणाऱया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ही प्रस्तावित सभा कुठे घ्यायची, असा पेच आता निर्माण झाला आहे.
गेल्या आठवड्यात पुण्याच्या दौऱयामध्ये राज ठाकरे यांनी नऊ फेब्रुवारी रोजी पुण्यात सभा घेऊन टोलसह विविध प्रश्नांवर भूमिका मांडण्याचे जाहीर केले होते. सुरुवातीला पक्षाच्या काही पदाधिकाऱयांनी सोशल नेटवर्किंग संकेतस्थळावर ही सभा स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर घेण्यात येईल, असे जाहीर केले होते. मात्र, स. प. महाविद्यालयाचे व्यवस्थापन पाहणाऱया शिक्षण प्रसारक मंडळी या संस्थेने सभेसाठी मैदान देता येणार नाही, असे स्पष्ट केले. त्यानंतर अलका टॉकीजजवळच्या टिळक चौकात सभा घेण्यासाठी पोलीसांकडे परवानगी मागण्यात आली. मात्र, वाहतुकीला अडथळा होईल, अशा ठिकाणी सभा घेण्यास परवानगी देता येणार नाही, असे स्पष्ट करीत पोलीसांनी परवानगी देण्यास नकार दिला. पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही सभा अलका टॉकीज चौकात किंवा प्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळील एसएसपीएमएसच्या मैदानावर घेतली जाण्याची शक्यता आहे.
गेल्या रविवारी मुंबईत ज्येष्ठ नागरिकांच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत गौप्यस्फोट करणार असल्याचे सूचित केले होते. टोलच्या प्रश्नावर दोन आठवड्यांपूर्वी मनसे कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन करीत विविध टोलनाक्यांची तोडफोड केली होती. या प्रश्नावर पक्षाचा पुढील कार्यक्रम काय असेल, हे सुद्धा या सभेमध्ये आपण स्पष्ट करणार आहोत, असे सांगून सभेनंतर बघा कसा राज्यात धुमाकूळ घालतो, असे राज ठाकरे म्हणाले होते. त्यामुळे त्यांच्या सभेकडे पक्षाच्या राज्यातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.