विकासकांमध्ये विरोधकांचा खोडा; आमदार महेश लांडगे यांचा आरोप

केवळ राजकारण होत राहिल्याने आतापर्यंत समाविष्ट गावांचा विकास रखडला होता, असे सांगत विरोधकांनी विकासकामांमध्ये राजकारण चालवले आहे, अशी टीका आमदार महेश लांडगे यांनी मोशीत केली. स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांच्यावर होणाऱ्या आरोपांचे खंडन करत त्यांचे काम चांगले असल्याचे प्रशस्तिपत्र लांडगे यांनी दिले. भोसरी मतदारसंघात एक नगरसेवक निवडून आणता आला नाही, अशी टीका त्यांनी शिवसेनेला उद्देशून केली.

स्थायी समितीने मंजूर केलेल्या रस्ते विकासाच्या ज्या कामांमध्ये संगनमत आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सध्या होत आहे, त्यातील पहिल्या टप्प्यातील ९० कोटींच्या कामांचा प्रारंभ आमदार लांडगे यांच्या हस्ते झाला. महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे, क्रीडा सभापती लक्ष्मण सस्ते, नगरसेविका सुवर्णा बुर्डे, भीमा फुगे आदी उपस्थित होते.

तीन वर्षांपासून माझ्या विरोधात सातत्याने पेपरबाजी होत असल्याचे सांगत लांडगे यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, २० वर्षांत तुम्हाला काहीच जमले नाही. भोसरी मतदारसंघात तुमच्या पक्षाचा एक नगरसेवक निवडून आणता आला नाही. आमचे नगरसेवक काम करत आहेत, तर त्यांच्या विरोधात तुम्ही काहीही बोलत आहात. समाविष्ट गावांकडे आजपर्यंत सर्वानीच दुर्लक्ष केले, केवळ मतांचे राजकारण झाले. मात्र, समाविष्ट गावांच्या विकासाचा शब्द भाजपने पाळला. मात्र, विकासकामांमध्ये खोडा घालण्याचे काम विरोधक करत आहेत. स्थायी समितीत रस्त्यांचे जे विषय मंजूर झाले, त्यात काहीही चुकीचे झाले नाही. विरोधकांचे आरोप खोटे आहेत. धमक असेल तर त्यांनी विकासाच्या मुद्दय़ावर आमने-सामने बसून बोलावे. आम्ही कोणाच्या टीकेला घाबरत नाही. सीमा सावळे यांची त्यांनी धास्ती घेतली आहे. म्हणूनच त्यांच्यावर खोटे आरोप करण्यात येत आहेत. वास्तविक गावांमधील रस्ते झाले म्हणून महापौर व स्थायी समिती अध्यक्षांचा त्यांनी सत्कार करायला हवा होता.

समाविष्ट गावांमध्ये २० वर्षांपासून रस्ते झाले नव्हते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती. भाजपने अविकसित रस्ते मार्गी लावणे आणि आरक्षणांचा विकास करण्याला प्राधान्य दिले असून त्याचे सर्व श्रेय आमदार महेश लांडगे व शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांचे आहे.

नितीन काळजे, महापौर, पिंपरी