पुणे विद्यापीठच्या ऐतिहासिक मुख्य इमारतीच्या नूतनीकरणाचे गेली अनेक वर्षे रखडलेले काम नक्की कधी पूर्ण होणार, असा प्रश्न चक्क कुलपतींच्या कार्यालयातून विद्यापीठाला विचारण्यात आला आहे. त्यामुळे आता तरी मुख्य इमारतीच्या दुरुस्तीच्या कामाला गती यावी, अशी अपेक्षा विद्यापीठामध्ये व्यक्त होत आहे.
पुणे विद्यापीठाची मुख्य इमारत ही ऐतिहासिक वास्तू आहे. या इमारतीच्या नूतनीकरणाचे काम गेल्या पाच वर्षांपासून सुरू आहे. २००८ साली सुरू झालेले इमारतीच्या नूतनीकरणाचे काम विविध कारणांमुळे रखडले आहे. पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीचे बांधकाम कधी होणार अशी विचारणा आता खुद्द कुलपतींच्या कार्यालयातून विचारण्यात आला आहे. विद्यापीठातील बांधकामांसंबंधी खर्चाची मर्यादा वाढवून घेण्याबाबत विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी कुलपतींच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांबरोबर बैठक झाली होती. त्या वेळी मुख्य इमारतीचे काम अजून का होत नाही, अशी चौकशी कुलपतींच्या सचिवांनी केली. इमारतीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही विद्यापीठातील अधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मार्च महिन्यामध्ये होणारी अधिसभाही मुख्य इमारतीमध्ये करण्याचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी जाहीरही केले होते. मात्र, प्रत्यक्षात विद्यापीठाच्या मुख्य इमारतीचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. काही दिवसांपूर्वी इमारतीचे काम करणाऱ्या कंत्राटदाराचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे सध्या इमारतीचे काम पूर्णपणे बंद आहे.