डॉ. गणेश देवी यांचे मत

आयुष्यात प्रत्येकाच्या यशाच्या व्याख्या वेगवेगळ्या असतात. त्यामुळे इतरांशी तुलना करून यशापयशाचे मोजमाप करणे अयोग्य आहे. तुलना करण्यातून येणारी निराशा माणसाला निष्क्रिय बनवते. जीवनात निराशेला स्थान देऊ  नका, असे मत ज्येष्ठ भाषातज्ज्ञ आणि राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांनी व्यक्त केले.राष्ट्र सेवा दलातर्फे साने गुरुजी स्मारक येथील ग्रंथालयाचे उद्घाटन डॉ. देवी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

कायदा आणि शिक्षण क्षेत्रात योगदान दिल्याबद्दल ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. सुधाकरराव आव्हाड यांचा डॉ. देवी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. श्रीकांत अगस्ते, राष्ट्र सेवा दलाचे पुणे शहराध्यक्ष भगवान कोकणे, जिल्हाध्यक्ष उमाकांत भावसार, अ‍ॅड. मल्हारी जायभाय या वेळी उपस्थित होते.

डॉ. देवी म्हणाले की, शिक्षण आणि करीअर यांचा थेट संबंध नसलेल्या अनेक यशस्वी व्यक्ती आपल्या आजूबाजूला दिसतात. त्यामुळे केवळ एकाच चौकटीबद्ध पद्धतीने पुढे न जाता विद्यार्थ्यांनी आपल्या जाणिवा वृद्धिंगत केल्या पाहिजेत.

अ‍ॅड. आव्हाड म्हणाले की, स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी राज्याच्या ग्रामीण भागातून हजारो विद्यार्थी पुण्यात येतात. त्यापैकी अनेकांचे शेतकरी पालक पोटाला चिमटे काढून मुलांना पैसे पाठवतात. प्रत्यक्षात मात्र परिस्थिती बिकट असून इथे येणारा प्रत्येक विद्यार्थी आपले स्वप्न पूर्ण करू  शकत नाही. त्यातून हे विद्यार्थी निराशेच्या गर्तेत लोटले जातात. यासाठी विद्यार्थ्यांनी कौशल्यावर आधारित  करीअरच्या आणखी एका पर्यायाचा विचार केला पाहिजे.