महाविद्यालयात ओळख झाल्यानंतर अल्पवयीन युवतीवर बलात्कार करणाऱ्या एकास दहा वर्ष सक्तमजुरी तसेच दहा हजार रु. दंड अशी शिक्षा विशेष न्यायाधीश के. के. जहागीरदार यांनी सुनावली. दंड न भरल्यास आणखी एक वर्ष अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असे न्यायालयाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

भीमराव ज्ञानोबा वावळे (वय २५,रा. बेनकर वस्ती, धायरी) असे शिक्षा सुनावलेलल्याचे नाव आहे. याबाबत पीडीत युवतीच्या वडिलांनी सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या खटल्यात विशेष सरकारी वकील ॲड. अरुंधती ब्रम्हे यांनी बाजू मांडली. २०१९ मध्ये पीडीत अल्पवयीन युवती आणि आरोपी वावळे यांची महाविद्यालयात ओळख झाली होती. दोघांमध्ये झालेल्या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर वावळेने युवतीला घरी बोलावून तिच्यावर बलात्कार केला. पीडीत मुलगी गर्भवती राहिली. त्यानंतर वावळेने तिच्यावर बलात्कार केल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सीमा चौधरी यांनी केला.

न्यायालयीन कामाकाजासाठी संजय जाधव यांनी सहाय्य केले. डीएनए चाचणी अहवाल तसेच पीडीत युवतीची साक्ष याप्रकरणी महत्त्वाची ठरली. सरकार पक्षाकडून करण्यात आलेला युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपीस दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली तसेच दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास आणखी एक वर्ष कारावासाची तरतूद न्यायालयाने केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सरकार पक्षाचा युक्तिवाद
आरोपीच्या वकिलांनी पीडीत अल्पवयीन युवतीची उलटतपासणी घेतली. संमतीने शरीर संबंध ठेवण्यात आल्याचा दावा बचाव पक्षाच्या वकिलांनी केला होता. ज्या वेळी युवतीवर बलात्कार केला होता, त्यावेळी ती अल्पवयीन होती. त्यामुळे तिची संमती ग्राह्य धरता येणार नाही. ती अल्पवयीन असल्याचे सरकार पक्षाकडून सिद्ध करण्यात आले, असे विशेष सरकारी वकील ॲड. अरुंधती ब्रह्मे यांनी सांगितले.