पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यात दहावीचा निकाल ३६.७८ टक्के, तर बारावीचा निकाल ३२.४६ टक्के लागला. गेल्यावर्षीच्या पुरवणी परीक्षेच्या निकालाच्या तुलनेत यंदा दोन्ही परीक्षांच्या निकालात वाढ झाली.

राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, सचिव अनुराधा ओक यांनी निकालाबाबतची माहिती दिली. राज्य मंडळातर्फे दहावीची पुरवणी परीक्षा १६ जुलै ते ३० ऑगस्ट या कालावधीत, तर बारावीची पुरवणी परीक्षा १६ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत घेण्यात आली. गुणपडताळणी, छायाप्रतीसाठी २४ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत अर्ज करता येणार आहे. पुनर्मूल्यांकनासाठी आधी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे आवश्यक आहे.

हेही वाचा – पुणे : शिरुर पोलीस ठाण्यासमोर डिझेल ओतून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

यंदा दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल ३६.७८ टक्के लागला. राज्यभरातून दहावीच्या ३२ हजार ३८६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या ३१ हजार २७० विद्यार्थ्यांपैकी ११ हजार ५०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात ३५.८९ टक्के मुले, तर ३८.८८ टक्के मुली आहेत. विभागीय मंडळनिहाय निकालामध्ये पुणे विभागातील १ हजार ७७१ (२८.६० टक्के), नागपूर विभागातील १हजार ४०९ (४९.९१ टक्के), छत्रपती संभाजीनगर विभागातील १ हजार ६८३ (४९.९४ टक्के), मुंबई विभागातील २ हजार ९५१ (२७.७६ टक्के), कोल्हापूर विभागातील ६३१ (३२.८१ टक्के), अमरावती विभागातील ६५१ (४०.२१ टक्के), नाशिक विभागातील १ हजार ३८५ (५२.०६ टक्के), लातूर विभागातील ९४४ (५०.३४ टक्के), तर कोकण विभागातील ७७ (४२.५४ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दहावीचा निकाल ६.९२ टक्क्यांनी वाढला.

हेही वाचा – Sharad Pawar : “मुख्यमंत्रीपदामध्ये रस नाही, परिवर्तनासाठी सत्ता हवी”, शरद पवार यांचे स्पष्टीकरण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल ३२.४६ टक्के लागला. बारावीच्या ६० हजार १६० विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या ५९ हजार २०० विद्यार्थ्यांपैकी १९ हजार २१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात विज्ञान शाखेचे १० हजार ४४९ (५२.५२ टक्के) कला शाखेचे ४ हजार ८९३ ( २४.८७ टक्के), वाणिज्य शाखेचे ३ हजार ४३० (१९.४४ टक्के), व्यवसाय अभ्यासक्रमाचे ४०६ (२१.६१ टक्के), तर आयटीआयचे ३९ (३३.३३ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णांमध्ये ३०.७६ टक्के मुले, तर ३५.५४ टक्के मुली आहेत. विभागीय मंडळनिहाय निकालात पुणे विभागातील २ हजार ७९२ (२६.५७ टक्के), नागपूर विभागातील २ हजार ७०७ (४०.५४ टक्के), छत्रपती संभाजीनगर विभागातील १ हजार ८५४ (४७.९५ टक्के), मुंबई विभागातील ५ हजार ९२९ (२५.५२ टक्के), कोल्हापूर विभागातील १ हजार ३६० (३३.४७ टक्के), अमरावती विभागातील १ हजार ३३५ (४२.५९ टक्के), नाशिक विभागातील १ हजार ३४३ (३६.८६ टक्के), लातूर विभागातील १ हजार ८१६ (४८.१६ टक्के), तर कोकण विभागातील ८१ (२५.६३ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा बारावीचा निकाल ०.३३ टक्के वाढला आहे.