पुणे : इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला झालेल्या विलंबाचा परिणाम प्रत्यक्ष प्रवेशांवरही होत असल्याचे चित्र आहे. पहिल्या फेरीतील प्रवेशासाठी सोमवारी (७ जुलै) सायंकाळी सहा वाजेपर्यंत मुदत आहे. मात्र, रविवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत पहिल्या फेरीत प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांपैकी सुमारे ६० टक्के विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केल्याचे संकेतस्थळावरील आकडेवारीवरून दिसून आले.

यंदा राज्य मंडळाने दहावीचा निकाल दरवर्षीच्या तुलनेत लवकर जाहीर केला. त्यामुळे प्रवेश प्रक्रियाही लवकरच मार्गी लागण्याची अपेक्षा होती. यंदा पहिल्यांदाच राज्यभरातील प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. प्रत्यक्षात, विविध प्रकारच्या तांत्रिक अडचणींनी प्रवेश प्रक्रियेला विलंब झाला. या पार्श्वभूमीवर, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने २८ जून रोजी पहिल्या फेरीची निवडयादी प्रसिद्ध केली. त्यात ६ लाख ३२ हजार १९४ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली, तर ४ लाख ५७ हजार ८४१ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले. अकरावीच्या संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार, रविवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत ३ लाख ८२ हजार १५४ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला होता. त्यामुळे पहिल्या फेरीत प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत ६० टक्के विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रवेश प्रक्रियेला थंड प्रतिसाद असल्याचे चित्र आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यंदा राज्यभरात अकरावीच्या प्रवेशासाठी ९ हजार ४३५ कनिष्ठ महाविद्यालयात २१ लाख २३ हजार ७२० जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी १३ लाख ६६ हजार ६३२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. प्रवेश प्रक्रियेत राखीव जागा (कोटा) आणि केंद्रीभूत प्रवेश मिळून एकूण ४ लाख ५७ हजार ३९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यात ७४ हजार ८८५ प्रवेश कोट्यातील जागांवर झाले आहेत. पहिल्या फेरीतील प्रवेशाची मुदत सोमवारी सायंकाळी संपुष्टात आल्यावर दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.