scorecardresearch

पंधरा वर्षे रखडलेले पुणे-दौंड लोहमार्ग विद्युतीकरण प्रगतिपथावर

पंधरा वर्षांपासूनची मागणी असलेले व मागील पाच वर्षांपूर्वी मंजुरी मिळालेल्या पुणे-दौंड लोहमार्गाच्या विद्युतीकरण कामाला सुरुवात झाल्यानंतर आता हे काम प्रगतिपथावर आहे.

पंधरा वर्षे रखडलेले पुणे-दौंड लोहमार्ग विद्युतीकरण प्रगतिपथावर

पंधरा वर्षांपासूनची मागणी असलेले व मागील पाच वर्षांपूर्वी मंजुरी मिळालेल्या पुणे-दौंड लोहमार्गाच्या विद्युतीकरण कामाला सुरुवात झाल्यानंतर आता हे काम प्रगतिपथावर आहे. या मार्गाचे विद्युतीकरण झाल्यास गाडय़ांचा वेग वाढल्याने गाडय़ांची संख्याही वाढविणे शक्य होणार असून, पुणे-लोणावळाप्रमाणे या मार्गावरही लोकल सुरू करता येणार आहेत.
पुणे रेल्वे स्थानक आंतरराष्ट्रीय करण्याची भाषा करण्यात येत असताना दुसऱ्या बाजूला पुणे-दौंड मार्गावर मात्र विद्युतीकरण नाही. या टप्प्यात इंधनावर गाडय़ा चालविल्या जातात. या मार्गावर प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. प्रवाशांची मागणी लक्षात घेता सुमारे पाच वर्षांपूर्वीच पुणे-दौंड मार्गाच्या विद्युतीकरणास रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली आहे. ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री असताना त्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्येही विद्युतीकरणाची रखडलेली कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर या कामाच्या निविदा काढण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या होत्या. त्यानंतर मात्र विद्युतीकरणाचे हे काम रेंगाळले होते. पुणे विभागासाठी असलेला निधी बॅनर्जी यांनी त्यांच्या राज्यात पळविला असल्याने हा निधी मिळाला नसल्याचा आरोपही त्या वेळी करण्यात येत होता.
पाच वर्षे कामाला मंजुरी मिळूनही निधीमुळे हे काम सुरू होऊ शकले नव्हते. अखेर गेल्या वर्षी या कामाला निधी मिळाला व काही महिन्यांपूर्वी हे काम सुरू करण्यात आले. पहिल्या टप्प्यामध्ये विद्युतीकरणाच्या खांबांसाठी पायाचे काम पूर्ण करण्यात आले असून, पुढील टप्प्यातील काम सध्या वेगात सुरू आहे. विद्युतीकरण झाल्यास अनेक समस्या सुटू शकणार आहेत. गाडय़ांचा वेग वाढल्यानंतर वाचलेल्या वेळामध्ये नवी गाडी सुरू करता येईल. मुख्य म्हणजे पुणे-लोणावळाप्रमाणे या मार्गावर लोकल गाडी सुरू करता येईल. पुणे ते दौंडच्या पट्टय़ातून पुण्यात रोज येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यांना लोकलचा मोठा फायदा होऊ शकेल. त्याचप्रमाणे थेट लोणावळा ते दौंड अशीही लोकल गाडीची सेवा सुरू करता येईल, त्याचाही फायदा अनेक प्रवाशांना होऊ शकणार आहे.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-09-2013 at 03:40 IST

संबंधित बातम्या