पुणे : दरवर्षी जगभरात २०० कोटी टन धूळ आणि रेतीचा वातावरणात प्रवेश होत आहे. धूळ आणि रेतीच्या एकूण घटनांपैकी २५ टक्के घटना मानवाच्या पर्यावरणातील अतिरेकी हस्तक्षेपामुळे होत आहेत. त्यामुळे शेतजमिनी मोठ्या प्रमाणावर नापीक होण्याचा धोका वाढला आहे, असे संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेने (एफएओ) म्हटले आहे.

दिल्लीसह पुणे, मुंबईतील वायुप्रदूषणाच्या प्रश्नात न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागल्याची घटना ताजी आहे. आता एफएओने संयुक्त राष्ट्राच्या कन्वेंशन टू कॉम्बैक्ट डेजर्टिफिकेशन (यूएनसीसीडी) या संस्थेच्या हवाल्याने धूळ आणि रेतीची वादळे, (सॅण्ड ॲण्ड डस्ट स्टॉर्म) हा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. या अहवालात धूळ आणि रेतीच्या वादळांकडे जगाचे लक्ष्य वेधण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचा >>>पुणे : प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना न केल्याने शापूरजी पालनजी कंपनीला दंड

अहवालात नमूद केल्यानुसार, खाण उद्योग, पाळीव पशूंची अतिरेकी चराई, शेती जमिनीचा अति वापर, अनियंत्रित शेती, जंगलांचा नाश, भूजलाचा अति उपसा आदी कारणांमुळे धूळ आणि रेतीच्या वादळांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे उत्तर आणि मध्य आशिया आणि आफ्रिकेतील सहारा वाळवंटाच्या परिसरात मोठे नुकसान होत आहे. धूळ आणि रेतीचे हवेतील प्रमाण वाढल्यामुळे श्वसनासंबंधी विकार वाढले आहेत. अस्थमा सारखे आजार बळावले आहेत. त्या शिवाय धुळीच्या वादळांमुळे जगभरात दरवर्षी दहा लाख चौरस किलोमीटर इतकी सुपीक जमीन नापीक होत आहे. त्याचा थेट परिणाम अन्न सुरक्षेवर होत आहे. २०१५ ते २०१९ या काळात ४२ लाख चौरस किलोमीटर इतक्या सुपीक जमिनीचे वाळवंटीकरण झाले आहे. आखाती देशांना त्याचा सर्वाधिक फटका बसत आहे. आफ्रिकेतील धुळीच्या वादळांमुळे अमेरिकेसह अन्य देशांतील हवेची गुणवत्ता धोकादायक पातळीवर जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देशात ५० कोटींहून अधिक लोकसंख्या प्रभावित

आशिया-पॉसिपिक क्षेत्रासाठी स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त राष्ट्र आर्थिक आणि सामाजिक आयोगाने ऑगस्ट २०२१ मध्ये जाहीर केलेल्या अहवालात भारतातील ५० कोटींपेक्षा जास्त लोकसंख्येला आणि तुर्कमेनिस्तान, पाकिस्तान, उज्बेकिस्तान, ताजाकिस्तान आणि इरानमधील सुमारे ८० टक्के लोकसंख्येला धूळ आणि रेतीच्या वादळांचा आणि त्यामुळे घसरलेल्या हवेच्या गुणवत्तेचा सामना करावा लागतो, असे म्हटले आहे. खाण उद्योगाच्या माध्यमातून हवेत पसरणाऱ्या धुळीचा प्रश्न प्रामुख्याने उत्तर गोलार्धात गंभीर आहे. दक्षिण गोलार्धात धुळीचा मुख्य स्रोत ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिका आणि दक्षिण आफ्रिका आहे. मध्य आशियातील वाळवंटी आणि मैदानी प्रदेशांनी व्यापलेला ८० टक्के भूभाग धूळ आणि रेतीच्या वादळांना कारणीभूत ठरतो आहे, असे ‘कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेजर्टिफिकेशन’ने म्हटले आहे.