पिंपरी : संरक्षण विभागाच्या देहूरोड आणि दिघीतील आस्थापनांमुळे बाधित होणाऱ्या तळवडे, चिखली, निगडी, दिघी, भोसरी संरक्षित हद्दीतील (रेडझोन) मालमत्तांना सामान्य करात ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. या निर्णयाचा ४३ हजार मालमत्ताधारकांना लाभ होणार आहे.
याबाबतच्या प्रस्तावाला महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सर्वसाधारण सभेत मान्यता दिली. महापालिकेने मालमत्ताकर आकारणीसाठी शहरातील मालमत्तांची ‘अ’, ‘ब’ व ‘क’ अशी वर्गवारी केली आहे. संबंधित भागातील वार्षिक भाडे दरावरून कर निश्चित केला आहे. रेडझोन बाधित परिसरात भाडे दर अत्यंत कमी आहे. मात्र, त्याचा समावेश विकसित भागाप्रमाणे ‘क’ वर्गामध्ये केला आहे. देहूरोड दारूगोळा कारखान्याच्या बाह्यसीमा भिंतीपासून दोन हजार आणि दिघी मॅगझिन डेपोपासून एक हजार १४५ मीटर परिघात रेड झोनची हद्द आहे. रेडझोन परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे आहेत. त्यामुळे दाट लोकवस्ती झाली.
शहरातील इतर भागाच्या तुलनेत रेडझोन भागाचा विकास झाला नाही. महापालिकेकडून पुरेशा नागरी सुविधा पुरविल्या जात नाहीत. इतर क्षेत्राच्या तुलनेने संरक्षित क्षेत्रामध्ये परिपूर्ण विकास होत नाही. त्यामुळे नागरिकांकडून कराचा भरणा करण्यास टाळाटाळ करुन कर सवलत देण्याची मागणी केली होती. त्यामुळे महापालिका प्रशासनाने रेडझोनबाधित मालमत्तांना सामान्य करात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा किवळे, विकासनगर, तळवडे, चिखली, निगडी, यमुनानगर, त्रिवेणीनगर, भोसरी, दिघी या भागातील ४३ हजार मालमत्तांना फायदा होणार आहे.
थकबाकीसह मूळ कर भरणे आवश्यक
या निर्णयाची अंमलबजावणी पुढील आर्थिक वर्षांपासून (२०२६-२७) केली जाणार आहे. योजनेचा १ एप्रिल २०२६ पासून लाभ घेता येईल. ही सवलत घेण्यासाठी रेडझोनमधील मालमत्ताधारकांना ३१ मार्च २०२६ पर्यंतचा संपूर्ण थकबाकीसह मूळ मालमत्ताकराचा भरणा करणे आवश्यक आहे. त्याशिवाय या ५० टक्के सवलतीचा लाभ मिळणार नाही. या सवलतीमुळे २५ कोटी रुपयांचा आर्थिक फटका महापालिकेला बसणार आहे.
‘रेडझोन’ हद्दीचा संभ्रम कायम
संरक्षण विभागाने २००२ मध्ये देहूरोड दारूगोळा कारखान्याच्या बाह्यसीमा भिंतीपासून दोन हजार यार्डपर्यंतचे क्षेत्र रेडझोन म्हणून घोषित केले आहे. शहरातील तळवडे, निगडी, त्रिवेणीनगर, रूपीनगर, यमुनानगर, रावेत, किवळे, चिखली, दिघी, भोसरी, वडमुखवाडी, च-हाेली, डुडुळगाव, बोपखेल हा रेडझोनने बाधित परिसर आहे. सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, पिंपरीगाव, पिंपळे सौदागर, कासारवाडी, दापोडी, फुगेवाडी या भागांना लागूनही लष्करी आस्थापना आहेत. रेडझोनची हद्द अचूकपणे स्पष्ट व्हावी म्हणून भूमी अभिलेख विभागाने ‘सॅटेलाईट’द्वारे मोजणी केली, त्यास एक वर्षे उलटून गेले तरी अंतिम नकाशा तयार झाला नाही. अचूक आणि स्पष्ट सीमा असलेला अधिकृत नकाशाची नागरिकांना प्रतीक्षा आहे. अचूक नकाशा प्रसिद्ध होत नसल्याने रेडझोन सीमेबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे.
महापालिकेने रेडझोनची हद्द स्पष्ट करणारा नकाशा प्रसिद्ध करावा. त्यामुळे नागरिकांचा संभ्रम दूर होईल. या योजनेचा लाभ घेता येईल.- पंकज बगाडे, प्रदेश सचिव, युवक काँग्रेस</strong>