शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात सुरू असलेल्या पावसाचा जोर सोमवारी सकाळपर्यंत काहीसा कमी झाला. त्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीत सुरू असलेला पाण्याचा विसर्ग ५५६४ क्युसेकपर्यंत कमी करण्यात आला. खडकवासला, पानशेत आणि वरसगाव ही तिन्ही धरणे १०० टक्के भरली असून केवळ टेमघर धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची प्रतिक्षा आहे.

सध्या चारही धरणांमधील पाणीसाठा २८.८० अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच ९८.८१ टक्क्यांवर पोहोचला आहे. रविवारी रात्रीपासून सोमवारी सकाळपर्यंत टेमघर धरण क्षेत्रात ५५ मिलिमीटर, वरसगाव धरण परिसरात २० मि.मी, पानशेत धरण परिसरात १९ मि.मी, तर खडकवासला धरण क्षेत्रात अवघ्या दोन मि.मी. पावसाची नोंद झाली. शनिवारी दिवसभर चारही धरणांच्या परिसरात कमी पाऊस झाल्याने खडकवासला धरणातून मुठा नदीत दिवसभर ७२७६ क्युसेकने पाणी सोडण्यात आले. सोमवारी सकाळपर्यंत हा विसर्ग ५५६४ क्युसेकपर्यंत कमी करण्यात आला आहे, असे खडकवासला धरण साखळी प्रकल्पाचे सहायक अभियंता यो.स.भंडलकर यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रमुख धरणांमधील पाणीसाठा टीएमसी, टक्क्यांत
टेमघर                   ३.३६      ९०.६५
वरसगाव               १२.८२    १००
पानशेत                 १०.६५    १००
खडकवासला        १.९७      १००
एकूण                   २८.८०   ९८.८१