पुणे : व्यायामशाळेतील (जिम) प्रशिक्षकाला मारहाण करुन त्याच्याकडील मोबाइल, आयपॅड असा मुद्देमाल लुटण्यात आल्याची घटना पुणे स्टेशन परिसरातील मालधक्का चौकात घडली. जिममधील प्रशिक्षकाची दुचाकी घेऊन पसार झालेल्या चोरट्यांना बंडगार्डन पोलिसांनी अटक केली.

या प्रकरणी हर्षल अंकुश शेळके (वय १९), सौरभ संजय चव्हाण (वय २३), राहुल खुशीयाल सारसर (वय १९, तिघे रा. कमेला वसाहत, कोंढवा), अनुराग गौतम बद्रीके (वय १९, रा. खडकी) यांना अटक करण्यात आली. आरोपी अनुराग आणि राहुल सराइत गुन्हेगार आहेत. याबाबत धर्मेश मनोहर नानी (वय २७, रा. बिबवेवाडी) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. दुचाकीस्वार धर्मेश नानी पुणे स्टेशन परिसरातील मालधक्का चौक परिसरातून निघाला होता. त्या वेळी आरोपी पाठीमागून आले. दुचाकीस्वार नानी याच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली आणि रस्त्यात दुचाकी का थांबविली, अशी विचारणा करुन त्याला बेदम मारहाण केली.

हेही वाचा >>> वानवडीतील अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखला, बालकल्याण समिती आणि पोलिसांची सतर्कता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नानी याच्याकडील दुचाकी, ५० हजारांचा मोबाइल संच, आयपॅड असा पावणेदोन लाख रुपयांचा मुद्देमाल लुटून चोरटे पसार झाले. नानीने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. बंडगार्डन पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला. सीसीटीव्ही चित्रीकरण आणि तांत्रिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार कोंढवा आणि खडकी भागातील गुन्हेगार अनुराग आणि राहुल यांनी साथीदारांशी संगनमत करुन लूटमार केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी पसार आरोपींना पकडले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रवींद्र गावडे, शिवाजी सरक, अनिल कुसाळकर, सागर घोरपडे आदींनी ही कारवाई केली.