पुणे : लोकमान्य नगर पुनर्विकासाच्या प्रश्नावरून राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली असतानाच पुनर्विकासाच्या या वादात शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) युवा नेते, विधीमंडळ पक्षनेते आदित्य ठाकरे यांनीही उडी घेत भाजपवर टीका केली आहे. लोकमान्य नगर पुनर्विकास प्रकल्पाला थेट मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या स्थगितीचा उल्लेख करत ठाकरे यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

लोकमान्यनगर येथील म्हाडाच्या इमारतींच्या पुनर्विकासावरून सध्या राजकारण तापले आहे. या भागातील अनेक इमारती जुन्या असून त्या पुनर्विकासाच्या प्रतिक्षेत आहेत. पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू होत असताना स्थानिक आमदार हेमंत रासने यांनी हस्तेक्षप करून या पुनर्विकासाच्या प्रस्तावाला स्थगिती मिळवून घेतली आहे. यासंदर्भात शिवसेनेचे (शिंदे) महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांनीही या प्रकरणात लक्ष घालण्याचे सूचक इशारा काही दिवसांपूर्वी दिला होता. यानंतर आदित्य ठाकरे यांनीही या प्रकरणात लक्ष घातले असून समाजमाध्यमातून प्रतिक्रिया देताना त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली आहे.

‘पुण्यात एका प्रकणात जैन समाजाची जागा एका मंत्र्याच्या जवळचा असलेला बांधकाम व्यावसायिक ढापण्याचे पहात आहे. तर दुसऱ्या प्रकरणात लोकमान्य नगरचा १६ एकराचा भूखंड दुसरा बिल्डर ढापू पहात आहे. लोकमान्य नगरमधील हजारो रहिवाशांनी स्वयंपुनर्विकासाचा पर्याय निवडून आपापले बांधकाम व्यावासयिक ठरवून काम सुरू केले होते. मात्र स्थानिक आमदाराने स्थगिती मागितली आणि मुख्यमंत्री कार्यालयाने ती तातडीने दिली. यात स्थानिक नागरिकांना लोकमान्यनगरचा एकत्रित विकास नको असेल तर तो त्यांचा हक्क आहे. त्यांच्या माथी सत्ताधाऱ्यांच्य लाडक्या बांधकाम व्यावसायिकाला ‘एकत्रित विकास’ स्वरुपात करण्याची आवश्यकता काय ?’ अशी विचारणा ठाकरे यांनी केली आहे. स्थानिक नागरिकांचा हक्क अबाधित ठेवून बिल्डर लाॅबीला मिळणारा पाठिंबा मुख्यमंत्री थांबवतील, अशी अपेक्षा आहे.

पुण्यात ऑप्टिक फायबर टाकण्यासाठी जे कंत्राट दिले गेले आहे तेही पुणेकरांचा त्रास वाढविणार आहे. पुण्यात सध्या जे काही थोटे रस्ते सुस्थितीत आहेत, ते ही या कामासाठी खोदले जाणार आहेत. रस्ते खोदाईसाठी महापालिका जे शुल्क आकारते ती रक्कम महापालिका घेऊ शकणार आहे का, की ठेकेदारांना सर्व काही माफ असा नवा कायदा करण्यात आला आहे. याबाबतही मुख्यमंत्र्यांनी कार्यालयातून माहिती घ्यावी, असेही ठाकरे यांनी म्हटले आहे.

सुनियोजित पुनर्विकासासाठी एकात्मिक विकास हवा

लोकमान्य नगर पुनर्विकासाच्या प्रश्नावर स्थानिक नागरिकांचा नोंदणीकृत लोकमान्य नगर रहिवासी संघ हा सन २०२१ पासून एकात्मिक (क्लस्टर) विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. संघाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल साकोरे यांची भेट घेऊन शासनाच्या विद्यमान धोरणानुसार एकात्मिक पुनर्विकास प्रक्रियेला गती देण्याची मागणी गुरुवारी केली. लोकमान्य नगरमधील बहुसंख्य रहिवासी एकात्मिक पुनर्विकासाच्या बाजूने आहेत आणि त्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्यास तयार आहेत. शासनाने योग्य निर्णय घेत लवकरात लवकर या पुनर्विकासाची अंमलबजावणी सुरू करावी, असे निवेदन देण्यात आले. यावेळी लोकमान्य नगर रहिवाशी संघाचे अध्यक्ष विनय देशमुख, सुनिल शहा, विजय चव्हाण, विनायक देवळणकर, प्रवीण परशुरामी, प्रशांत मोहोळकर तसेच इतर सदस्य उपस्थित होते.