पुणे : लोकसभा व विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला पाठिंबा जाहीर करणाऱ्या आम आदमी पक्षाने (आप) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ‘आप’ स्वतंत्र लढणार असल्याचे पक्षाचे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीत केंद्रात सत्ताधारी असलेल्या मोदी सरकारच्या विरोधात रणशिंग फुंकून ‘आप’ने इंडिया आघाडीला पाठिंबा जाहीर केला होता. विधानसभेच्या निवडणुकीत देखील भाजप आणि शिवसेना (शिंदे) पक्षाची ध्येय-धोरणे न पटल्याने ‘आप’ने महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता. मात्र, आता काँग्रेसचा हात सोडत स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. यापूर्वी पक्षाने पुणे जिल्हा परिषद निवडणूक तसेच पंचायत समिती, गण व गटही स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय जाहीर केला होता.
‘राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्ष स्वबळावर निवडणूक लढविणार आहे. त्यानुसार तयारी करण्याचे आदेश पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिले आहेत. लोकसभेला इंडिया आघाडीला पाठिंबा जाहीर केल्याने पक्षाने लोकसभेसाठी राज्यात कोठेही उमेदवार उभा केला नव्हता.
विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी काही मतदारसंघांची पक्षाकडे मागणी करून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्षाने स्वबळावर लढाव्यात, अशी मागणी करण्यात येत होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.’ असे किर्दत यांनी स्पष्ट केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी. तसेच पक्ष, संघटना बांधणीसाठी स्वबळावर निवडणूक लढविणे हा पर्याय स्वीकारण्यात आला आहे. – मुकुंद किर्दत, प्रदेश प्रवक्ते, आप.