पुणे : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला तो दिवस म्हणजे ३ ऑक्टोबर आता अभिजात मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ३ ऑक्टोबरपासून अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्यात येणार असून, त्या संदर्भात मराठी भाषा विभागाने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.
मराठीला अभिजात दर्जा देताना मराठी भाषेची सुमारे अडीच हजार वर्षांची परंपरा गृहीत धरण्यात आली आहे. प्राचीन ग्रंथांची, लिपींची, व्यवहाराची आणि विविध कला प्रकारातील भाषा विविध समाजघटकांपुढे येण्यासाठी, मराठीचे वैभव जपण्यासाठी, भाषेचे संवर्धन होण्याबरोबरच भाषेच्या अभिजाततेची ओळख व्हावी, भाषेतील संशोधनासंदर्भात जनजागृती व्हावी या उद्देशातून दर वर्षी ३ ऑक्टोबर हा अभिजात मराठी भाषा दिवस, तसेच ९ ऑक्टोबरपर्यंत मराठी भाषा सप्ताह साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मराठी भाषा विभागाने शासन अध्यादेशाद्वारे प्रसारित केले आहे.
सप्ताहातील उपक्रम
- अभिजात मराठी भाषेसंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचे व्याख्यान, चर्चासत्र, परिसंवाद, कार्यशाळा, शिबिरांचे आयोजन करणे
- ताम्रपट आणि शिलालेखांसह अभिजात मराठी ग्रंथांचे प्रदर्शन भरविणे
- प्राचीन ग्रंथसंपदेचे समकालीन मराठीमध्ये अनुवाद केलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन आणि विक्री करणे.
- अभिजात मराठी ग्रंथसंपदेचे डिजिटायझेशन करून त्यांची शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना ओळख करून देणे.
- शाळा, महाविद्यालये, तसेच शासकीय कार्यालयांमध्ये मराठी भाषेसंदर्भात प्रश्नमंजूषा, निबंधलेखन, वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करणे.