पुणे : दिवाळीनिमित्त राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) १६ ते १८ ऑक्टोबर या चार दिवसांत पुणे विभागातील स्वारगेट, शिवाजीनगर आणि पिंपरी-चिंचवड तीन स्थानकांवरून बसच्या सहा हजार फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. त्याद्वारे सुमारे अडीच लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. प्रवाशांच्या प्रतिसादामुळे ‘एसटी’च्या तिजोरीत सुमारे सहा कोटी रुपये जमा झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत २.१० कोटी रुपये जास्त मिळाल्याने यंदा ‘एसटी’वर ‘लक्ष्मी’ प्रसन्न झाली आहे.

‘दिवाळीनिमित्त प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन शहरातील स्वारगेट, वाकडेवाडी (शिवाजीनगर) आणि वल्लभनगर (पिंपरी चिंचवड) या स्थानकांमधून ५८९ अतिरिक्त फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार १५ ते १८ ऑक्टोबर या चार दिवसांत सहा हजार फेऱ्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. आतापर्यत अडीच लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. त्यामध्ये वाकडेवाडी बस स्थानकावरून नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, अहिल्यानगर, लातूर, धाराशिव आणि परभणी या जिल्ह्यांसाठी सर्वाधिक ९०० फेऱ्यांची वाढ करण्यात आली. गेल्या वर्षी या स्थानकावरून ६०० फेऱ्या झाल्या होत्या, असे पुणे एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक अरूण सिया यांनी सांगितले.

‘स्वारगेट स्थानकावरून ७५० फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. या स्थानकावरून कोल्हापूर, सातारा, सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांकडे बस सोडण्यात आल्या. मागील वर्षी ४५० फेऱ्या झाल्या होत्या,’ असे सिया यांनी स्पष्ट केले.

‘वल्लभनगर स्थानकावरूनही नाशिक, धुळे, जळगाव, नागपूर, तसेच मराठवाड्यात बीड, जालना, परभणी, जिंतूर, अंबाजोगाई, माजलगाव, हिंगोली, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यांत ६५० पेक्षा अधिक फेऱ्या झाल्या आहेत. प्रवाशांच्या मागणीनुसार फेऱ्या वाढवण्यात आल्या, असे सिया यांनी नमूद केले.

एसटी महामंडळाने दिवाळीनिमित्त तिकीट दर वाढ न करता अतिरिक्त ५८९ गाड्या सोडण्याचा निर्णय घेतल्याने प्रवाशांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांंकडून अतिरिक्त दर आकारण्यात आल्याने प्रवाशांनी ‘एसटी’ला प्राधान्य दिल्याचे स्पष्ट झाले आहे. – अरूण सिया, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, पुणे