पुणे : गुंड गजा मारणेच्या साथीदारास गुन्हे शाखेने सांगलीतून अटक केली. मारणे येरवडा कारागृहातून सांगलीतील कारागृहात हलविण्यात येत असताना वाटेत एका ढाब्यावर मारणेने मटण पार्टी केल्याचे उघडकीस आले होते. त्या वेळी मारणेला पैसे आणि कपडे पुरविण्यात आले होते. याप्रकरणात मारणेच्या सांगलीतील साथीदाराला पोलिसांनी अटक केली.
बाळकृष्ण उर्फ पांड्या लक्ष्मण मोहिते (वय ४०, रा. सीतारामनगर, सांगली) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. कोथरूडमध्ये दुचाकीस्वाराला मारहाण केल्याच्या प्रकरणात मारणे आणि साथीदार येरवडा कारागृहात आहेत.
सुरक्षेच्या कारणास्तव मारणेला सांगली येथील कारागृहात नेण्यात येत होते. त्या वेळी पोलीस बंदोबस्तावर सहायक पोलीस निरीक्षकासह चार पोलीस कर्मचारी होते. वाटेत एका ढाब्यावर मारणेची व्हॅन थांबविण्यात आली. बंदोबस्तात असलेल्या सहायक पोलीस निरीक्षकासह पाच पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याच्याबरोबर ढाब्यावर जेवण केले. मारणेच्या व्हॅनबरोबर असलेल्या मोटारीतील साथीदारांनी मारणेला बिर्याणी नेऊन दिली.
मारणेला तेथे सतीश शिळीमकर, विशाल धुमाळ, बाळकृष्ण ऊर्फ पांड्या मोहिते हे भेटले. तपासात ही बाब उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी मकोका कायद्यान्वये शिळीमकर, धुमाळ आणि मोहिते यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
मोहितेला पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली. अतिरिक्त पाेलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट दाेनचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सहायक निरीक्षक आशिष कवठेकर, उज्ज्वल मोकाशी, कुंभार आणि पथकाने ही कारवाई केली. मोहितेला अटक करून बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी तपासासाठी पोलीस कोठडी देण्याची विनंती केली. विशेष मकोका न्यायालयाने मोहिते याला पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.