पुणे : सिंहगड रस्त्यावरील धायरी भागात दहशत माजविणारा गुंड साजन शहा याच्याविरुद्ध पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्याचा आदेश दिला. पोलीस आयुक्तांच्या आदेशाने शहा याला वर्षभरासाठी जालना कारागृहात स्थानबद्ध करण्यात येणार आहे.
साजन विनोद शहा (वय १९) याच्याविरुद्ध शस्त्र बाळगणे, मारहाण, चोरी अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. त्याच्याविरुद्ध प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. कारवाईनंतरही त्याच्या वर्तनात सुधारणा झाली नव्हती. त्याच्या दहशतीमुळे नागरिक पोलिसांकडे तक्रार करत नव्हते.
नांदेड सिटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दत्तात्रय मोरे आणि पथकाने शहा याच्याविरुद्ध झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. संबंधित प्रस्ताव पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे पाठविण्यात आला होता.
पोलीस आयुक्तांनी या प्रस्तावाला मंजुरी देऊन शहा याची जालना कारागृहात रवानगी करण्याचा आदेश दिला. पोलीस आयुक्तांच्या आदेशाने गेल्या दीड वर्षात शंभरहून अधिक गुंडांविरुद्ध एमपीडीए कारवाई करण्यात आली आहे.