पुणे : मेफेड्रोनची विक्री प्रकरणात तृतीयपंथीयासह तिघांना अमली पदार्थ विरोधी कृती दलाने (टास्क फोर्स) अटक केली. त्यांच्याकडून चार लाख ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मेघा दीपक जगताप (वय २७, रा. महादेवनगर, हडपसर), तृतीयपंथीय स्नेहल ऊर्फ गणेश शिवसांच (वय २१, रा. ससाणेनगर रस्ता, हडपसर), सलमान सलीम शेख (रा. घोरपडे पेठ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आरोपींविरुद्ध अमली पदार्थ विरोधी प्रतिबंधक कायद्यान्वये हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमली पदार्थ विरोधी कृती दलाचे पथक (टास्क फोर्स) हडपसर, वानवडी, काळेपडळ भागात गस्त घालत होते. त्यावेळी हडपसरमधील १५ नंबर चौकात आरोपी मेघा आणि तृतीयपंथीय स्नेहल उर्फ गणेश हे दुचाकीवरुन आले होते. त्यांच्याकडे मेफेड्रोन असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली.
त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मेफेड्रोन, दुचाकी, वजनकाटा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौकशीत घोरपडे पेठेत राहणारा आरोपी सलमान शेख याने त्यांना मेफेड्रोन विक्रीसाठी दिल्याची माहिती दिली. पोलिसांनी शेख याला ताब्यात घेऊन अटक केली.
पोलीस उपअधीक्षक उमेश तावसकर, पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील, सरोजनी चव्हाण, सहायक निरीक्षक माधवानंद धोत्रे आणि पथकाने ही कारवाई केली. पुणे शहर परिसरात अमली पदार्थांची तस्करी आणि विक्रीवर कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहे. अमली पदार्थ विक्रेत्यांविरुद्ध कारवाईसाठी पोलिसांनी विशेष पथक स्थापन केले आहे.
