५ हजार ५८६ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय

पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीत १७ हजार ६२ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला. तर ५ हजार ५८६ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले असून, प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना १७ ऑगस्टपर्यत प्रवेश निश्चित करायचा आहे. 

महाविद्यालयांमध्ये १ लाख ८ हजार ८३० जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यापैकी ८५ हजार २४० जागा केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेद्वारे भरल्या जाणार आहेत. पहिल्या फेरीत २५ हजार ७९९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. तर राखीव जागांद्वारे (कोटा) ६ हजार २५१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. शुक्रवार सायंकाळपर्यंत ३३ हजार ८४० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीत ५ हजार ५८६ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे, ३ हजार ८१८ विद्यार्थ्यांना दुसऱ्या पसंतीचे, तर २ हजार २६३ विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले. एकूण १७ हजार ६२ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आला. त्यात विज्ञान शाखेत ८ हजार ९०८, वाणिज्य शाखेत इंग्रजी माध्यमासाठी ४ हजार ९२६, मराठी माध्यमासाठी १ हजार ४३४, कला शाखेत इंग्रजी माध्यमासाठी ७७६, मराठी माध्यमासाठी ७८४, तर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी २३४ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला. 

प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्याना कागदपत्र पडताळणी आणि प्रवेशाची प्रक्रिया १७ ऑगस्टपर्यंत पूर्ण करावी लागेल. पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील फेरीत सहभागी करून घेतले जाणार नाही. प्रवेशाची तिसरी फेरी १८ ऑगस्टपासून सुरू होणार आहे.

दुसऱ्या फेरीतही पात्रता गुण नव्वदीपार…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीतही नामांकित महाविद्यालयातील प्रवेशासाठीचे पात्रता गुण नव्वदीपारच आहेत. त्यात बीएमसीसीमध्ये ९४.६० टक्के, फर्ग्युसनमध्ये कला शाखेसाठी ९६.२० टक्के, स. प. महाविद्यालयात विज्ञान शाखेत ९१.४० टक्के, कला शाखेसाठी ९३ टक्के, सिम्बायोसिस महाविद्यालयात कला शाखेसाठी ९४ टक्के आणि वाणिज्य शाखेसाठी ९१.६० टक्के, शामराव कलमाडी महाविद्यालयात विज्ञान शाखेसाठी ९३ टक्के, मॉडर्न महाविद्यालयात विज्ञान शाखेसाठी ९०.६० टक्के गुण आवश्यक आहेत.