पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात दिवाळीमुळे वायुप्रदूषणात वाढ झाली असून, हवेची गुणवत्ता अतिखराब नोंदविण्यात आली आहे. वाकड आणि शिवाजीनगर परिसरात हवा सर्वाधिक खराब आहे. या परिसरात राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे मास्कचा वापर करण्यासह इतर काळजी घेण्याचा सल्ला आरोग्यतज्ज्ञांनी दिला आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार, पुणे परिसरातील हवा गुणवत्ता निर्देशांक सोमवारी दुपारी ४ वाजता ३१५ वर पोहोचला. वाकडमधील भूमकर चौकात ही नोंद करण्यात आली. ही हवेची अतिखराब पातळी मानली जाते. भूमकर चौकात रविवारी हवा गुणवत्ता निर्देशांक ३०० होता. त्यात आणखी वाढ झालेली आहे. पुण्यातील शिवाजीनगर येथील म्हाडा कॉलनीत हवा गुणवत्ता निर्देशांक २४८ वर नोंदविण्यात आला. त्यानंतर पाषाणमधील पंचवटी १४४, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ १२८, निगडी १२३ आणि हडपसर ९० अशी हवा गुणवत्ता निर्देशांकाची नोंद झाली. पुण्यात हडपसर परिसरातील हवेची गुणवत्ता समाधानकारक असून, पाषाण, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि निगडीत हवेची गुणवत्ता मध्यम आहे. याच वेळी म्हाडा कॉलनीत हवेची गुणवत्ता खराब आहे.
हवेची गुणवत्ता घसरल्याने आरोग्याच्या तक्रारी वाढल्याकडे ससून रुग्णालयातील श्वसनविकार विभागाचे प्रमुख डॉ. संजय गायकवाड यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, की पुण्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. यातून पसरणाऱ्या धुळीमुळे प्रदूषणात मोठी वाढ होत आहे. शिवाय दिवाळीत फटाके वाजविण्यामुळे हवा प्रदूषणात आणखी भर पडत आहे. खराब हवेचा परिणाम श्वसनविकार असलेल्या रुग्णांना अधिक होतो. त्याचबरोबर हृदयविकार असलेल्या रुग्णांनाही या हवेमुळे त्रास वाढतो.
ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना हवा प्रदूषणामुळे मोठ्या प्रमाणात त्रास होतो. ज्येष्ठांची प्रतिकारशक्ती कमकुवत झाली असल्याने त्यांच्यात अशा हवेमुळे खोकल्यासह श्वसनास त्रास असे प्रकार दिसून येतात. लहान मुले प्रामुख्याने फटाके वाजवितात. त्यामुळे फटाक्यांतून बाहेर पडणाऱ्या विषारी वायूंच्या थेट संपर्कात ही मुले येतात. त्यातून या मुलांना दम्यासह श्वसनविकाराचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे दिवाळीच्या काळात प्रदूषण वाढलेले असताना ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांची अधिक काळजी घ्यावी, असेही डॉ. गायकवाड यांनी नमूद केले.
काळजी काय घ्यावी?
हवेची गुणवत्ता तपासा : हवा गुणवत्ता निर्देशांक तपासून कधी काळजी घ्यावी लागते, हे जाणून घ्या.
बाहेर जाणे टाळा : हवेची गुणवत्ता खराब असल्यास बाहेर जाणे टाळावे.
मास्कचा वापर करा : हवा खराब असताना बाहेर जायचे असेल, तर एन ९५ अथवा एन ९९ मास्कचा वापर करावा.
मैदानावर व्यायाम टाळा : हवा प्रदूषण जास्त असेल, तर मैदाने अथवा मोकळ्या जागी व्यायाम करणे टाळावे.
हवा शुद्धीकरण यंत्राचा वापर करा : घरातील हवेची पातळी सुधारण्यासाठी हवा शुद्धीकरण यंत्राचा वापर करावा.