पुणे : नागरिकांचे प्रश्न लोकप्रतिनिधींकडून सुटले जावेत, एवढीच त्यांची माफक अपेक्षा असते. त्यामध्ये दुमत असण्याचे कारण नाही. नागरिकांच्या दैनंदिन समस्या, अपेक्षा, सूचना या त्यांच्याकडे स्थानिक पातळीवर जाऊन जाणून घेतल्या पाहिजेत, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकप्रतिनिधींना देत, मंत्रालयात बसून नागरिकांचे प्रश्न सुटत नसतात, असा उपरोधक टोला लगावला.

महाराष्ट्र मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशनच्या (महामेट्रो) छत्रपती संभाजी उद्यान स्थानक ते पेठ भागाला जोडणाऱ्या तानपुरा आकारातील पादचारी पुलाची आणि मेट्रोच्या कामांची बुधवारी सकाळी पवार यांनी बारकाईने पाहणी केली. तसेच ज्या ठिकाणी त्रुटी आढळून आल्या, त्या दुरुस्तीचे आदेश दिले. तसेच सकाळी पादचारी पुलावरून जाणाऱ्या नागरिकांकडून त्यांन समस्याही जाणून घेतल्या. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीहकर, महापालिका अधिकारी, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. त्यानंतर पवार या्ंनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

पवार म्हणाले, ‘नागरिकांचे काम म्हणजे ते सरकारी काम असते. चांगल्या गोष्टींचे कौतुक होत असते. काहीवेळेस त्यातून नवीन कल्पनाही समोर येत असतात. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी अशा समस्या जाणून घ्याव्यात.’

भिडे पुलाचे स्थापत्य लेखापरीक्षण

महाराष्ट्रात जुने पूल कोसळून दुर्घटना घडल्यानंतर प्रत्येक महानगरपालिका, सार्वजनिक बा्ंधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) यांना स्थापत्य लेखापरीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार पुण्याच्या पूर्व – पश्चिम भागांना जोडणारा भिडे पूल हा ब्रिटीशकालीन आहे. खडकवासलल्यातील नांदेड सिटी येथे देखील असाच एक पूल आहे. धरणसाखळीतून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यावर हे पूल पाण्यात जातात. म्हणून या पुलाचे स्थापत्य लेखापरीक्षण करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. नव्याने बांधण्यात आलेले पादचारी पूल उत्तम आणि नैसर्गिक आपत्तीला तोंड देणारे आहे. धरणातून एक लाख क्युसेक्स वेगाने पाणी सोडले, तरी हे पूल पाण्याखाली जाणार नाहीत. बदलत्या निसर्गचक्रानुसार महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी त्यांची उभारणी केली असल्याचे पवार यांनी सांगितले.

निवडणूक आयोगाला तथ्य आढळल्यास दखल घेतील

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारच्या शिष्टमंडळाने राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली, त्यानंतर मी भूमिका मांडली आहे. कोणाला भेटावे, कोणाले भेटू नये हा प्रत्येकाचा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये या गोष्टी होत असतात. निवडणूक आयोगाविरोधात तक्रार, शंका-कुशंका, विधायक सूचना योग्य वाटल्यास त्यांचे लक्ष घातले पाहिजे. त्यांना स्वायत्तता आहे. तसेच जबाबदारी देखील आहे. त्यानुसार पारदर्शक निवडणुका होतील, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.