पुणे : बारामती आणि लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीमध्ये इंदूर शहराच्या धर्तीवर घनकचरा प्रकल्प राबविण्यात यावा, अशी सूचना उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्हा प्रशासनाला केली. चाकण-राजगुरुनगरजवळच्या दहा गावांचा मिळून क्लस्टर पद्धतीने प्रकल्प राबविण्यात येणार आहे. येत्या सात दिवसांत गावांची निवड करून जागांची पाहणी करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

अजित पवार यांनी विधानभवनात विविध प्रकल्पांची आढावा बैठक घेतली. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी व्यंकटेशन दुर्वास, बारामती नगरपालिकेचे मुख्याधिकारी पंकज भुसे, चाकणचे अंकुश जाधव, लोणावळाचे मुख्याधिकारी अशोक साबळे तसेच राजगुरूनगरचे अंबादास गरकळ उपस्थित होते.

इंदूरमध्ये घनकचरा प्रकल्पांचा अभ्यास करणाऱ्या एका कंपनीच्या प्रतिनिधींनी पवार यांच्यासमोर चाकण क्लस्टर, बारामती आणि लोणावळा या दोन नगरपालिकांमध्ये इंदूर शहराच्या धर्तीवर प्रकल्प कसे राबविता येईल, याचे सादरीकरण केले.

‘इंदूर शहरामध्ये दररोज कचऱ्याचे कशा पद्धतीने संकलन कसे केले जाते, त्याचे वर्गीकरण कशा पद्धतीने होते, तसेच त्या कचऱ्याची विल्हेवाट लावून रस्ते कसे स्वच्छ केले जातात या गोष्टींचा अभ्यास करा. त्या पद्धतीने बारामती आणि लोणावळा शहरात घनकचरा प्रकल्प राबविण्यात यावा,’ असे पवार यांनी स्पष्ट केले. बारामती येथील प्रकल्पासाठी २५ ते ३० कोटी, तर लोणावळ्यातील प्रकल्पासाठी २० ते २५ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.

चाकण आणि राजगुरूनगर नगरपरिषदांसह नजीकच्या दहा गावांचा एकत्रित घनकचरा प्रकल्प राबविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. त्यावेळी घनकचरा प्रकल्पांसाठी जागा आवश्यक असून, क्लस्टर पद्धतीने हा घनकचरा प्रकल्प राबविण्याच्या सूचना पवार यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना केली.

या भागात असलेल्या ‘एमआयडीसी’ची सहा एकर जागा आहे. त्या जागेचा पर्यायही बैठकीत देण्यात आला. चाकण-राजगुरूनगर नगरपरिषदांसह दहा गावांचा १३० टन क्षमतेचा प्रकल्प साकारण्याचे नियोजन आहे. त्यातून बायो सीएनजी निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे ५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.