पिंपरी- चिंचवड: पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आळंदी देवस्थानने पुढाकार घेतला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे २१ लाखांचा धनादेश आळंदी देवस्थानने सुपूर्द केला आहे. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हा धनादेश देण्यात आला आहे.

मराठवाड्यात अतिमुसळधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेती, घरे, जनावरे सर्व काही शेतकऱ्याने गमावले आहे. शेतकऱ्याला सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे. अनेक दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था या देखील सरकारच्या मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत करताना दिसत आहेत. खऱ्या अर्थाने शेतकरीच वारकरी आहे. माऊलींच्या भेटीला आल्यानंतर शेतकरी घडेल ते मदत दानपेटीत देणगी म्हणून देत असतो. तोच वारकरी, शेतकरी संकटात सापडल्याने आळंदी देवस्थाने पुढाकार घेऊन मदतीचा हात दिला आहे.

आळंदी देवस्थानने खारीचा वाटा उचलून सामाजिक भान ठेवत २१ लाखांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला आहे. मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात सहाय्यता निधीचा धनादेश देण्यात आला आहे. यावेळी आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, राजेंद्र उमाप, भावार्थ देखणे, चैतन्य महाराज कबीर, पुरुषोत्तम महाराज पाटील, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आदी उपस्थित होते.