scorecardresearch

सोमवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा ;  बैठकीत पाणीकपातीवर शिक्कामोर्तब ; वेळापत्रक शुक्रवारी जाहीर होणार

पाणीकपातीचे वेळापत्रक येत्या दोन दिवसांपर्यंत जाहीर केले जाणार आहे, असे पाणीपुरवठा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

Pune-Water-shortage
प्रतिनिधिक छायाचित्र

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला साखळी प्रकल्पातील पाण्याने तळ गाठल्याने पाणीकपातीचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सोमवारपासून (४ जुलै) करण्याचे निश्चित करण्यात आले असून महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून आज शुक्रवारी पाणीकपातीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठ्याने तळ गाठल्याने शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचे जवळपास निश्चित झाले होते. खडकवासला धरण प्रकल्पातील पाणीसाठा कमी झाल्याने पिण्याच्या पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे पत्र जलसंपदा विभागाने महापालिकेला पाठविले होते. धरणात पंधरा जुलैपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा असल्याने पाणीकपातीचा निर्णय महापालिकेला घ्यावाच लागणार असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र त्याबाबत आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक लांबणीवर पडत होती. आयुक्त विक्रम कुमार यांनी गुरुवारी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन आढावा घेतला. त्या वेळी पाणीकपात करण्याचा आणि त्याची अंमलबजावणी सोमवारपासून करण्याचे निश्चित करण्यात आले. पाणीकपातीचे वेळापत्रक आज शुक्रवारी जाहीर केले जाणार आहे, असे पाणीपुरवठा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार असला तरी एकूण पाणी वापरात साधारणपणे २५ ते ३० टक्क्यांपर्यंत पाणीकपात केली जाईल. सध्या रोजचा पाण्याचा वापर १ हजार ६५० दशलक्ष लिटर एवढा आहे. त्यात ३० टक्क्यांपर्यंत कपात केली तर रोज सरासरी १ हजार २०० दशलक्ष लिटर पाणी वापर करावा लागणार आहे. त्यामुळे ४५० दशलक्ष लिटर पाणी कमी घेण्यात येणार असल्याने काही भागात पाणीटंचाई होण्याची शक्यता आहे.

शहरात गेल्या दहा महिन्यांपासून अपुरा, विस्कळीत आणि असमान पाणीपुरवठा होत आहे. शहरात पाणीकपात सुरू झाल्यानंतर अनेक भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेकडून दैनंदिन १ हजार ६५० दशलक्ष लिटर पाणी धरणातून घेण्यात येत आहे. मात्र आता ते १ हजार २०० दशलक्ष लिटर पाणी घेण्यात येणार असल्याने अनेक भागांचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. समान पाणीपुरवठा योजनेची कामे शहरात सध्या सुरू आहेत. त्यामुळे अनेक भागाला अपुरा पाणीपुरवठा होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र पाणीकपातीमुळे नागरिकांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

उशिरा निर्णय

धरणातील पाण्याने तळ गाठल्याने पाणकपातीचा निर्णय यापूर्वीच होणे अपेक्षित होते. मात्र पाऊस पडेल, या अपेक्षेने पाणीकपातीचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला. जलसंपदा विभागाकडून त्यासंदर्भात महापालिकेला वेळोवेळी इशारा देण्यात आला होता. पंधरा जुलैपर्यंतच पुरेल एवढे पाणी धरणात राहिल्याने पाणीकपात करण्याची हालचाल पाणीपुरवठा विभागाकडून सुरू झाली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Alternate day water supply in pcmc limits area from monday pune print news zws