पुणे : पुणे-नगर-औरंगाबाद द्रुतगती महामार्गासाठी पुणे जिल्ह्यातील जमीन ताब्यात घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी भूसंपादन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. हा महामार्ग जिल्ह्यातील भोर, पुरंदर, हवेली, दौंड आणि शिरूर तालुक्यातून जाणार आहे.
भारतमाला टप्पा दोन परियोजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातून ग्रीनफिल्ड राष्ट्रीय महामार्ग जाणार आहे. भोर तालुक्यातील मौजे कांजळे, वरवे बुद्रुक, कासुर्डी ख.बा., कासुर्डी गु.मा. आणि शिवरे, पुरंदर तालुक्यातील थापेवाडी, वरवडी, गराडे, कोडीत खु., चांबळी, पवारवाडी, सासवड, हिवरे, दिवे, काळेवाडी आणि सोनोरी, हवेली तालुक्यातील आळंदी-म्हातोबाची, तरडे, वळती, शिंदवणे, सोरतापवाडी, कोरेगाव-मूळ, भवारपूर, हिंगणगाव आणि मिरवाडी, दौंड तालुक्यातील दहिटणे, देवकरवाडी, पिलनवाडी, पाटेठाण, तेलेवाडी, राहू, वडगाव बांडे, टाकळी आणि पानवली, शिरूर तालुक्यातील उराळगाव, सत्कारवाडी, दहीवाडी, आंबळे, करडे, बाभुळसर खु., रांजणगाव गणपती, करेगाव, चव्हाणवाडी आणि गोळेगाव या गावांतून जाणार आहे. या पाच तालुक्यांमधील ४४ गावांमधून जाणार आहे.

दरम्यान, भोर तालुक्यातील भूसंपादनासाठी भोर-वेल्हाचे उपविभागीय अधिकारी, पुरंदर आणि दौंडसाठी दौंड-पुरंदरचे उपविभागीय अधिकारी, हवेलीसाठी हवेलीचे उपविभागीय अधिकारी, तर शिरूर तालुक्यासाठी पुणे शहर-शिरूरचे उपविभागीय अधिकारी यांना भूसंपादनासाठी सक्षम अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी प्राधिकृत केले आहे.

हेही वाचा: पुणे-नाशिक रस्त्याची दुरुस्ती दहा दिवसांत न केल्यास… खासदार अमोल कोल्हे यांचा संबंधितांना इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेमका प्रकल्प काय?

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (नॅशनल हायवेज ॲथॉरिटी ऑफ इंडिया – एनएचएआय) भारतमाला प्रकल्पांतर्गत पुणे-नगर-औरंगाबाद द्रुतगती महामार्ग प्रस्तावित केला आहे. पुणे-औरंगाबाद या नियोजित २६८ किलोमीटर लांबीच्या सहा किंवा आठपदरी द्रुतगती महामार्गाच्या भूसंपादनाच्या माध्यमातून सहा हजार कोटींचा मोबदला बाधितांना दिला जाणार आहे. तसेच एनएचएआयकडून भूसंपादन, स्थानिक गावांसाठी सेवा रस्ते, जिल्ह्यातील प्रमुख रस्ते महामार्गाला जोडण्यात येणार आहेत.