वॉरंट अधिकाऱ्याच्या आरोपामुळे आत्महत्या केल्याचा सुभेदाराचा आरोप
लोहगाव येथील हवाई दलाच्या तळावर नेमणुकीस असलेल्या सुभेदाराने स्वत:वर रिव्हॉल्वरमधून गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. लष्करातील एका अधिकाऱ्याने (वॉरंट ऑफिसर) केलेल्या आरोपांमुळे आत्महत्या केली, अशी चिठ्ठी आत्महत्या करण्यापूर्वी सुभेदाराने लिहिली होती. ही चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली असून या घटनेची लष्करातर्फे चौकशी सुरू करण्यात आली आहे.
बिअंत सिंग असे आत्महत्या केलेल्या सुभेदाराचे नाव आहे. सिंग मूळचे हिमाचल प्रदेशचे रहिवासी आहेत. लष्करात सुभेदार असलेले सिंग यांची नेमणूक लोहगाव येथील हवाई दलाच्या तळावर करण्यात आली होती. सिंग हे विवाहित होते. त्यांच्या मागे पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सुभेदार सिंग यांनी रिव्हॉल्वरमधून स्वत:वर दोन गोळ्या झाडल्या. यामध्ये ते जागीच मृत्युमुखी पडले.
या घटनेची माहिती मिळताच हवाई दलातील अधिकारी आणि विमानतळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. तेव्हा सिंग यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी (सुसाइड नोट) सापडली. एका अधिकाऱ्याने माझ्यावर केलेल्या आरोपांमुळे आयुष्य उद्ध्वस्त झाले. माझ्या मृत्यूपश्चात मिळणारी रक्कम मुलांना देण्यात यावी, असे सिंग यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी चिठ्ठी ताब्यात घेतली आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती सिंग यांच्या कुटुंबीयांना कळविण्यात आली आहे. या घटनेची लष्करी पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे, असे हवाई दलाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
या संदर्भात विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय कुरुंदकर म्हणाले, की सुभेदार सिंग यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत एका अधिकाऱ्याचे नाव आहे. परंतु या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे. अद्याप सिंग यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नाही. लष्करातर्फे सुरू असलेल्या चौकशीत दोषींची नावे निष्पन्न झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. सिंग यांच्या मृतदेहाचे लष्कराच्या वैद्यकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येणार आहे. त्यानंतर उद्या (२५ मे) सिंग यांचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येईल.
संग्रहित लेख, दिनांक 25th May 2016 रोजी प्रकाशित
लोहगाव येथील हवाई दलाच्या तळावर सुभेदाराची गोळी झाडून आत्महत्या
बिअंत सिंग असे आत्महत्या केलेल्या सुभेदाराचे नाव आहे. सिंग मूळचे हिमाचल प्रदेशचे रहिवासी आहेत.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 25-05-2016 at 03:03 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Army subedar shoots himself dead