पुणे : बनावट कागदपत्रांच्या आधारे एका महिलेला जमीनमालक असल्याचे भासवून नगर रस्त्यावरील वाघोली येथील दहा एकर जमीन बळकाविण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात चंदननगर पोलीस ठाण्याच्या तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह त्याच्या मेव्हणा सामील असल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह चौघांविरुद्ध फसवणूक, तसेच बनावट दस्त तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आनंद लालासाहेब भगत (केसवड वस्ती, वाडेगाव, ता. हवेली) याला चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने शुक्रवारी त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
भगत याच्यासह शैलेश सदाशिव ठोंबरे (रा. ससाणेनगर, हडपसर), चंदननगर पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सावरसिद्ध लांडगे आणि अर्चना पटेकर (रा. इस्लामपूर, सांगली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २०२२ ते मे २०२३ दरम्यान हा प्रकार घडला. याबाबत चंदननगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक स्वाती खेडकर यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली भागातील गट क्रमांक १२७६, हिस्सा ३८ येथे दुबईत वास्तव्यास असलेल्या एका महिलेच्या नावे दहा एकर जमीन आहे. ही जमीन बळकाविण्याचा कट आरोपींनी रचला. इस्लामपूरमधील अर्चना पटेकर हिचे नाव वेगळे सांगून ती मूळ मालक असल्याचे भासवण्यात आले. तिच्या नावाने बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड तयार करून बनावट दस्त तयार केले. त्यानंतर २०२२ ते १७ मे २०२३ या कालावधीत हवेली निबंधक कार्यालय क्र. ७ येथे खरेदीखताची नोंदणी करण्यात आली. मूळ जमीन मालक महिलेच्या नावाचा गैरवापर करून तिच्या जागी अर्चना पटेकर हिला दस्त नोंदणीसाठी उभे करण्यात आले.
पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या जुन्या प्रकरणांचा निपटारा करताना ही बाब उघडकीस आली. या प्रकरणात चंदनगर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक लांडगे, त्यांचा मेव्हणा ठोंबरे, भगत आदी सामील असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे तपास करत आहेत.
आरोपीच्या घराच्या झडतीत कागदपत्रे
पोलिसांनी आनंद भगत याच्या वाडेगाव येथील राहत्या घराची झडती घेतली. येथून पोलिसांनी वेगवेगळ्या नावाचे दस्तावेज, छायाप्रती, खरेदीखत, संमतीपत्रे, करारनामे, वीज देयक अशी कागदपत्रे जप्त केली. मूळ मालक असलेल्या महिलेच्या नावाने तयार करण्यात आलेली बनावट कागदपत्रे सापडली. या प्रकरणाचा सखोल तपास करायचा असून, आराेपी भगतला पोलीस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकील योगेश कदम यांनी न्यायालयाकडे दिली. न्यायालयाने भगतला २० मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.