पुणे : सिंहगड रस्त्यावरील राजाराम पुलावरून रविवारी दुपारी एका महाविद्यालयीन तरुणाने नदीपात्रात उडी मारली. अग्निशमन दलाच्या जवानांच्या तत्परतेमुळे नदीपात्रात उडी मारणारा तरुण बचावला. आषाढी एकादशीनिमित्त सिंहगड रस्त्यावरील विठ्ठलवाडी परिसरातील मंदिरात भाविकांची गर्दी झाली होती. रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास राजाराम पुलावरून एका तरुणाने नदीपात्रात उडी मारल्याची माहिती नागरिकांनी अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली. अग्निशमन दलाच्या एरंडवणे अग्निशमन केंद्रातील जवान विठ्ठलवाडी परिसरात तैनात होते.

नदीपात्रात तरुणाने उडी मारल्याची माहिती मिळताच जवान अमोल शिंदे, अनंत जाधव, निलेश पाटील, राहुल वाघमोडे, सुमीत कांबळे, सागर मुंडे, कमलेश माने यांनी नदीपात्रात शोधमोहीम राबविली. पाण्यात पडलेल्या तरुणाला बाहेर काढले. उडी मारणारा विद्यार्थी अभियांत्रिकी शाखेत शिक्षण घेत आहे. अनुत्तीर्ण झाल्याने त्याने नैराश्यातून पुलावरुन उडी मारली, अशी माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाने दिली.