पुणे : डेक्कन जिमखाना आणि शहरातील मध्यवर्ती पेठांचा भाग जोडणारा बाबा भिडे पूल २१ एप्रिलपासून ६ जूनपर्यंत वाहतुकीसाठी पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे मेट्रोच्या डेक्कन जिमखाना स्टेशनच्या कामासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळीच हा पूल वाहतुकीसाठी अचानक बंद करण्यात आल्याने नागरिकांचा मोठा गोंधळ उडाला. त्यामुळे तूर्तास दोन दिवस हा पूल वाहतुकीसाठी सुरू ठेवण्यात येणार आहे. शहरातील मध्यवर्ती भागातील बाबा भिडे पूल बंद राहणार असल्याचा फलक शुक्रवारी सकाळी या ठिकाणी लावण्यात आला आणि पुलाच्या दोन्ही बाजूंना बॅरिकेट लावल्या. या पुलाचा वापर हजारो नागरिक करतात. नागरिकांना कुठलीही कल्पना न देता पूल अचानक बंद करण्यात आल्याने गोंधळ उडाला. पूल बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मेट्रो प्रशासनाने महापालिकेला दिली नव्हती. परस्पर पूल बंद केल्याने अनेकांनी महापालिकेतील अधिकाऱ्यांना चौकशीसाठी फोन केल्यानंतर मेट्रोने हा पूल वाहतुकीसाठी बंद केल्याचे समोर आले.
डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशनजवळ मेट्रोला पुलाच्या गर्डरचे काम करायचे आहे. त्यासाठी मेट्रो प्रशासनाने भिडे पूल वाहतुकीसाठी बंद ठेवावा, अशी परवानगी पोलिसांच्या वाहतूक शाखेकडे मागितली होती. वाहतूक शाखेने ही परवानगी दिली आहे. मात्र, यामध्ये पुणे मेट्रो प्रशासनाने आणि पोलिसांच्या वाहतूक शाखेने महापालिकेला याची कल्पना न दिल्याने शुक्रवारी सकाळी अचानक हा पूल वाहतुकीसाठी बंद केल्यामुळे गोंधळ उडाला.
नागरिकांनी महापालिकेकडे विचारणा केल्यानंतर पालिका अधिकाऱ्यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. कोणतीही पूर्वकल्पना न देता अशा पद्धतीने भिडे पूल वाहतुकीसाठी बंद केल्यास गोंधळ उडेल, त्यामुळे पुढील दोन दिवस याबाबत जनजागृती करून पूल बंद करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेतील अधिकाऱ्यांनी दिली. पुलावर लावण्यात आलेले बॅरिकेट नंतर काढून टाकण्यात आले आणि पुलावरून वाहतूक पूर्ववत झाली. डेक्कन भागातील भिडे पूल बंद केल्यानंतर नागरिकांनी छत्रपती संभाजी पूल (लकडी पूल), विठ्ठल रामजी शिंदे पूल (बालगंधर्व येथील पूल) आणि काकासाहेब गाडगीळ पूल (झेड ब्रिज) या पर्यायी पुलांचा वापर करावा, असे आवाहन मेट्रोतर्फे करण्यात आले आहे.
नागरिकांच्या सुरक्षेसाठी निर्णय
डेक्कन मेट्रो स्टेशन परिसरात पादचारी पूल उभारणीचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या कामासाठी भिडे पुलाच्या पश्चिम बाजूला मोठ्या प्रमाणावर खोदकाम सुरू करण्यात आले आहे. या कामामध्ये वाहतुकीचा अडथळा होऊ नये, तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी बाबा भिडे पूल काही दिवस वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय मेट्रो प्रशासनाने घेतला आहे.
पूल बंद केल्यानंतर मेट्रो प्रशासनाशी संपर्क साधण्यात आला. नागरिकांना याबाबत पूर्वकल्पना देण्याची सूचना करण्यात आली. त्यानुसार दोन दिवस पूल सुरू ठेवण्यात येणार आहे. पूल बंद ठेवण्यास मेट्रोला पोलिसांनी परवानगी दिली आहे. युवराज देशमुख, मुख्य अभियंता (प्रकल्प), पुणे महापालिका