पुणे : बच्चू कडू ज्येष्ठ असून ते एका पक्षाचे अध्यक्षही आहेत. त्यांचा योग्य सन्मान दुसऱ्या टप्प्यात ठेवला जाईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही तसे सांगितले आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी येथे दिली.

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार करण्यात आला. या मंत्रीमंडळात अपक्ष आमदारांना संधी देण्यात आली नाही. त्यामुळे आमदार बच्चू कडू नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे प्रवक्ता आणि मंत्री दीपक केसरकर यांनी त्याबाबत प्रतिक्रिया दिली.

शिंदे गटाला समर्थन देणाऱ्या आमदारांनध्ये दोन अपक्ष मंत्री होते आणि त्यापैकी एकाला मंत्रीमंडळात स्थान दिले असे तर वेगळा संदेश गेला असता. बच्चू कडू ज्येष्ठ आहेत. त्यांचा योग्य तो सन्मान ठेवला जाईल. त्यांचे आणि माझे चांगले संबंध आहे. मी त्यांची भेट घेणार आहे. यात नाराजी वैगैरे काही नाही. मंत्रीमंडळात माझाही समावेश होईल की नाही, याबाबत मलाही खात्री नव्हती, असे केसरकर यांनी सांगितले.

बंजारा समाजाचे नेते, मंत्री संजय राठोड यांना मंत्रीमंडळात स्थान देण्यात आल्यावरून शिंदे-फडणवीस सरकावर टीका होत आहे. त्याबाबतही केसरकर यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, राठोड यांच्यावर कित्येक महिन्यांपूर्वी आरोप झाला होता. त्या आरोपांची चौकशी झाल्यानंतर ते दोषी आढळले नाहीत. त्यांच्या विरोधात दोषारोपत्र नाही. या प्रकरणाची निपक्षपातीपणे चौकशी होईल. मात्र ते दोषी नसतील तर त्यांना मंत्रीमंडळातून दूर ठेवणे योग्य नाही, असे केसरकर यांनी स्पष्ट केले.