पुणे : इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदीच्या पाठ्यपुस्तकांची छपाई करण्यात आल्याच्या चर्चांचे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाने (बालभारती) खंडन केले आहे.
‘मुख्यमंत्री, शालेय शिक्षणमंत्री यांनी हिंदी सक्तीबाबत स्थगिती जाहीर केली. त्यानंतर शासनाकडून शुद्धिपत्रक, नवीन शासन निर्णय प्रतीक्षाधीन आहे. बालभारतीने इयत्ता पहिलीच्या इंग्रजी व मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी सक्तीच्या हिंदी विषयाची पाठ्यपुस्तके छपाई केल्याचे विविध माध्यमांतून प्रसिद्ध होत असलेले वृत्त चुकीचे आहे. याबाबत शासन आदेशानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल,’ असे पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०नुसार, पहिलीपासून नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी राज्यात करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने शालेय शिक्षण विभागाच्या १६ एप्रिल २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार इयत्ता पहिलीपासून इंग्रजी आणि मराठी माध्यमाच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हिंदी हा विषय अनिवार्य करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
या शासन निर्णयाबाबत विविध राजकीय संघटना, अन्य घटकांनी केलेल्या विरोधानंतर शासन निर्णयामधील हिंदी सक्तीबाबत, तसेच नंतर तिसऱ्या भाषेबाबतही स्थगिती जाहीर करण्यात आली. मात्र, तिसऱ्या भाषेला स्थगिती देण्याच्या घोषणेचा शासन निर्णय प्रसिद्ध झालेला नाही. त्यामुळे हिंदीच्या पाठ्यपुस्तकांची छपाई ‘बालभारती’ने केल्याची चर्चा शिक्षण क्षेत्रात सुरू होती. या पार्श्वभूमीवर, ‘बालभारती’चे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे स्पष्टीकरण दिले.