बारामती : शहरातील भिगवण रोडवरी एका बँकेचे व्यवस्थापक शिवशंकर मित्रा (वय ४५, मूळ.रा. उत्तर प्रदेश, सध्या रा. बारामती) यांनी गुरुवारी मध्यरात्री बँकेतच गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी डोळे दान करावे अशी इच्छा व्यक्त केली असून, मुलीची आणि पत्नीची माफी मागितली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती शाखेतील बँकेत कार्यरत असणारे शाखेचे व्यवस्थापक शिवशंकर मित्रा यांनी कामाच्या ताणावामुळे आत्महत्या केली आहे. याबाबत आत्महत्येपूर्वी मित्रा यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये नमूद केले आहे. बँकेला त्यांनी विनंती केली आहे की, ‘कर्मचार्यांवर अतिरिक्त कामाचा ताण देऊ नका. सर्वांना जबाबदारीची जाणीव आहे. मी आत्महत्या पूर्णतः शुद्धीत असताना आपल्या इच्छेनुसार करत आहे, यात माझ्या कुटुंबाचा काहीही संबंध नाही,’ असे नमूद केले आहे.
दरम्यान, ‘कामाच्या तणावामुळेच आत्महत्या केल्याचे सुइसाइड नोटमध्ये आहे. याबाबत पुढील तपास सुरू आहे,’ अशी माहिती पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी दिली.