पुणे: ‘हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता असल्याने सर्व विभागांनी पूर परिस्थितीत जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी. तसेच, आपत्तीपूर्व सूक्ष्म नियोजनावर भर द्यावा,’ अशी सूचना विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केली. मान्सूनपूर्व तयारीसंदर्भात विभागस्तरीय आढावा डाॅ. पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्या वेळी त्यांनी ही सूचना केली.

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अपर आयुक्त महेश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, तसेच विभागातील सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

डॉ. पुलकुंडवार म्हणाले, ‘जिल्हास्तरावर महसूल, पोलीस, जलसंपदा, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था,आरोग्य आदी विभागांनी समन्वयासाठी बैठक घ्यावी. औषधे आणि रास्तभाव दुकानातील अन्नधान्य पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहील, याची दक्षता घ्यावी. पूरस्थितीत नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करून पाऊस अधिक झाल्यास दळणवळण आणि वाहतूक सुविधा कार्यरत राहतील, याची दक्षता घ्यावी.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पावसाळ्यात २४ तास यंत्रणा कार्यरत ठेवण्यात यावेत.’दरम्यान, एनडीआरएफने पुण्यासाठी २ पथके कायमस्वरूपी ठेवावीत आणि एक पथक राखीव असावे. तर कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यांत प्रत्येकी एक पथक असावे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पूर परिस्थितीत वाहतूक वळविण्याबाबत नियोजन करावे, अशी सूचनाही त्यांनी केली.