पुणे : एकतर्फी प्रेमातून तरुणीवर कोयत्याने वार केल्याची घटना ताजी असतानाच, ‘तू माझ्यासोबत बोलत का नाही’, अशी विचारणा करीत एकाने दांडक्याने मारहाण करून डोके फोडले आहे. ही घटना बुधवारी (१२ जुलै) सातच्या सुमारास कोरेगाव पार्कमधील बर्निग घाट परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

संकेत शहाजी म्हस्के (वय २६ रा. संत गाडगे महाराज वसाहत, कोरेगाव पार्क ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. हसीना कुंजू (वय ३७) असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संकेत हा कुंजूचा मित्र असून दोघेही एकाच परिसरात राहायला आहेत. मागील काही दिवसांपासून कुंजू त्याच्यासोबत बोलत नव्हती. त्याच रागातून संकेतने बुधवारी तिला बर्निग घाट परिसरात गाठले.

हेही वाचा >>>पिंपरी : ६० लाख खर्च करून मुलीचा धुमधडाक्यात केला विवाह; सासरच्यांनी केला छळ, पती करायचा अनैसर्गिक लैंगिक अत्याचार!

‘तू मला भेटत का नाही, माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू माझी होऊ शकत नाही, तर कोणाचीही होऊ देणार नाही’, असे म्हणत शिवीगाळ केली. ‘माझे तुझ्यावर प्रेम नाही’, असे म्हटल्यावर आरोपीने दांडक्याने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. हातावर पायावर मारहाणीमुळे तरुणी खाली पडल्यानंतरही संकेतने तिच्या डोक्यात दांडक्याने मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.  पोलीस उपनिरीक्षक महेश वराळ तपास करीत आहेत.